खरिपात अतिवृष्टी झाल्याने तूर पिकाला फटका बसला. त्याचबरोबर उत्पादन घटले. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये तुरीची आवकही घटली. आवक कमी झाली आणि मागणी वाढली की दरात वाढ होते, या अर्थशास्त्रीय नियमाप्रमाणे बाजार समित्यांत तुरीच्या दरात वाढ झाली. शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात ७ आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती. या केंद्रावर जिल्ह्यातील ७ हजार १८ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली; परंतु खुल्या बाजारपेठेत अधिक दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा तुरीची एक रुपयाचीही खरेदी होऊ शकली नाही.
--बॉक्स--
हंगाम संपल्यानंतर आवक सुरूच!
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक ५१७ क्विंटलपर्यंत होत आहे. कमाल भाव ६ हजार ९००, सर्वसाधारण ६ हजार ५०० तर किमान दर ६ हजार रुपये प्रति क्विंटल असा मिळत आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरी क्विंटलमागे ५०० रुपये अधिक पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणीच केली आहे.
--बॉक्स--
शेतकऱ्यांनी फिरविली पाठ
दरवर्षी खरेदी केंद्रावर सोयाबीन, तूर, हरभरा विक्रीसाठी रांगा लागत असतात; परंतु यंदा बाजारपेठेत अधिक दर मिळू लागल्याने एकाही शेतकऱ्याने तूर विक्री केली नाही. तूर विक्रीसाठी ७ हजार १८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती व सगळ्या शेतकऱ्यांना मॅसेज पाठविण्यात आले आहे, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.