अकोला : राज्यात कोरोनासोबतच झिका व्हायरसचाही धोका वाढताना दिसत आहे. यापासून बचावाच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाने जिल्ह्यात फवारणीचे निर्देश दिले असून, नागरिकांनीही आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात असताना डासांचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. या डासांमुळेच झिका व्हायरसचा धोका वाढला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील डबक्यांमध्ये फवारणी करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागातर्फे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला फवारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिका क्षेत्रातील काही भागांत फवारणीस सुरुवात झाली असून, ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी फवारणी केली जात आहे.
कशामुळे होतो?
झिका व्हायरसचा आजार हा डेंग्यू प्रमाणेच डासांपासून होतो. डास चावल्यानंतर झिका आजाराची लागण होते. त्यामुळे डासांपासून स्वत:चे संरक्षण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
झिका व्हायरसची लक्षणे काय?
ताप
त्वचेवर लाल रंगाचे डाग
डोकेदुखी
सांधे दुखी
डोळे लाल होणे
उपाययोजना काय?
सध्या झिका व्हायरसवर कोणतीही लस किंवा ठोस उपचार नाहीत. झिका व्हायरस आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम करताे. अशा परिस्थितीत स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणे आणि त्यापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाच त्यावर योग्य उपाय आहे.
डेंग्यूप्रमाणेच झिका व्हायरसदेखील डासांपासूनच पसरतो. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आवश्यक कारवाई केली जात आहे. नागरिकांनीही डासांची उत्पत्ती होऊ नये, या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घ्यावी.
- डॉ. आदित्य महानकर, जिल्हा हिवताप अधिकारी