अकोला : जिल्ह्यात १४४ कलम लागू झाले, त्यामुळे पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही, त्याचवेळी जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा उद्या सोमवारी आयोजित आहे, ती रद्द केली जात आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी सांगितले.राज्यात सध्या कोरोना व्हायरसची दहशत आहे. तसेच सर्वच जिल्हा दंडाधिकारी आपत्ती व साथरोग प्रतिबंधक कायदा, जमावबंदीही लागू केली आहे. दरवर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर अर्थसंकल्पीय सभा नियोजित केल्या जातात. या परिस्थितीत महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदांच्या अर्थसंकल्पाच्या सभा घेण्याचे आव्हान उभे ठाकले. अकोला जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा उद्या २३ मार्च रोजी बोलावण्यात आली. जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत २३ मार्च रोजी ही सभा घेण्याचे नियोजन झाले; मात्र मुख्यमंत्र्यांनीच राज्यात कलम १४४ लागू केल्याची घोषणा रविवारी दुपारी केली. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमता येत नाही. या परिस्थितीत सभा घेणे अशक्य आहे. या कारणासाठी सभा रद्द केली जात आहे. तसेच अर्थसंकल्पाबाबत पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडून मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात शासनाकडून ते मिळणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अर्थसंकल्पाची सभा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:36 PM