अकोला: जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची पाहणी करीत झाडाझडती घेतली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कामांची माहिती घेतली.जिल्हा परिषदेच्या कृषी,आरोग्य, शिक्षण व इतर विभागांच्या कार्यालयांना भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी केली. त्यामध्ये संबंधित विभागाच्या कार्यालयाची इमारत, स्वच्छता, परिसर स्वच्छता, अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था यासंदर्भात पाहणी करून कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाºयांसोबत चर्चा करून, त्यांच्याकडील कामांची माहिती घेतली. योग्य नियोजन करून काम करण्याच्या सूचना देत, संबंधित विषयाची फाईल व्यवस्थित ठेवून, आवक -जावक रजिस्टरमध्ये व्यवस्थित नोंदी ठेवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी-कर्मचाºयांना दिल्या. तसेच आस्थापना, तांत्रिक व लेखा शाखेच्या कामात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधितांना दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवणे, कृषी विकास अधिकारी मुरलीधर इंगळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.ग्रामीण भागातील समस्यांचे तातडीने निवारण करणार!जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाºयांच्या समन्वयातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांचे तातडीने निवारण करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे प्रशासन गतिमान आणि पारदर्शक करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितले.