लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. विहित मुदतीत जिल्ह्यात ४४२ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने, ७६९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांमधील उमेदवारांच्या लढती निश्चित झाल्या आहेत.अकोला जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या निवडणुकीसाठी १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत उमेदवारांकडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी २४ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. छाननीअंती प्रक्रियेत जिल्हा परिषदसाठी ५१० उमेदवारांचे ५७३ उमेदवारी अर्ज तर सातही पंचायत समित्यांसाठी ७०१ उमेदवारांचे ७३८ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. विहित मुदतीत जिल्हा परिषदसाठी २३३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी २७७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले. तसेच पंचायत समित्यांसाठी २०९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ४९२ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणनिहाय उमेदवारांच्या लढती निश्चित झाल्या आहेत.
उमेदवारांना चिन्हांचे वाटप; गट-गणांमध्ये रणधुमाळी सुरू!जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी संपल्यानंतर, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जिल्ह्यातील निवडणूक चिन्हांचे वाटप वाटप करण्यात आले. उमेदवारांच्या लढती निश्चित झाल्यानंतर आणि निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यानंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांमध्ये उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.