- सदानंद सिरसाट
अकोला: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रथमच भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढत असताना या परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या ५३ गट आणि १०५ गणांत केवळ भाजपनेच शंभर टक्के उमेदवार रिंगणात आणले आहेत. त्याचवेळी जिल्ह्यात पाळेमुळे रोवलेल्या भारिप-बमसंला अनेक गणांत ऐनवेळी उमेदवारी देणे कठीण गेले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेची अनेक गट, गणांतही उमेदवार देताना दमछाक झाली आहे. जिल्ह्यात चौरंगी लढतीचे चित्र असताना भारिप-बमसंच्या उमेदवारांना किमान १५ गट, गणांतील स्वपक्षीय बंडखोर व अपक्षांच्या साखळीने आव्हान दिल्याने निकालाचे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसापर्यंत बंडखोरांची मनधरणी करण्याची तयारी पक्षासह उमेदवारांनी सुरू केली आहे. त्यामध्ये यश मिळाल्यास त्याचा परिणामही निकालावर होणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही सत्तेचे समीकरण बदलण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून महाविकास आघाडी निर्मितीची चाचपणी झाली. सत्तेच्या मुद्यावर एकत्र आले तरी ध्येय-धोरणांमध्ये फरक असल्याने निवडणूक एकत्र लढण्याच्या विषयाला बाजूला ठेवण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतला. त्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व शिवसेना स्वतंत्रपणे लढण्याचे ठरले. त्यासाठी काँग्रेसने ३७ जागांवर उमेदवारी यादी प्रसिद्धीस दिली. त्यापैकी ५ गट राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन गट शिवसेनेसाठी असल्याचे नमूद केले. त्यामुळे काँग्रेसने केवळ ३० गटांमध्ये उमेदवार दिले आहेत. त्यापैकी तीन भारिप-बमसंचे बंडखोर आहेत, तर ३० गटांच्या ६० गणांमध्ये उमेदवारी न देता ५५ गणांतच उमेदवार देण्याची वेळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या १८ गटांत उमेदवारी दिली तर त्यातुलनेत पंचायत समितीच्या ४० गटांमध्ये उमेदवारी दिली. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची संख्या पाहता जिल्हा परिषदेचे ४८ गट आणि ९५ गणांत लढतीमध्ये सहभाग घेतला. राष्ट्रीय व राज्यस्तरीय असलेल्या या दोन्ही पक्षांना जिल्ह्यातील ५ गट आणि ११ गणांत उमेदवारी घेता का, असे विचारण्याची वेळ आली. शिवसेनेने प्रथमच स्वबळावर असताना ४९ गट व ९९ गणांत उमेदवार दिले आहेत. भाजपने सर्वच जिल्हा परिषद गटांसह १०५ गणांत उमेदवार दिले. एका घुसर गणात भाजप समर्थित उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे भाजपनेही निवडणुकीसाठी चांगलीच तयारी केल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात भारिप-बमसंचा प्रभाव असला तरी ऐनवेळी उमेदवारी संदर्भात वाद झाल्याने पंचायत समितीच्या तीन ते पाच गणांत पक्षाचे उमेदवार रिंगणात नसल्याची माहिती आहे. आसेगाव, भांबेरी गटात हा प्रकार घडला आहे. आसेगाव गटात प्रबळ इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या वाघोडे, प्रदीप वानखडे या दोघांचीही दावेदारी रद्द झाल्याने ऐनवेळी गोंधळ उडाला. त्यांच्यासोबत गणांत निवडणूक लढण्यासाठी उत्सुकांनी रिंगणातून काढता पाय घेतला. हा प्र्रकार कमी-अधिक प्रमाणात बºयाच ठिकाणी घडला आहे.