जिल्हा परिषद निवडणूक : महाविकास आघाडीने जपले मैत्र; भाजपचा मित्राला ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 11:30 PM2019-12-25T23:30:30+5:302019-12-25T23:35:02+5:30
सर्वच जागांसाठी महाविकास आघाडी शक्य झाली नसली तरी महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांनी काही प्रमाणात राजकीय मैत्र जपल्याचे स्पष्ट झाले आहे.
- राजेश शेगोकार
अकोला : शिवसेनेच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही हाच प्रयोग करण्याचे प्रयत्न झाले मात्र सर्वच जागांसाठी महाविकास आघाडी शक्य झाली नसली तरी महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांनी काही प्रमाणात राजकीय मैत्र जपल्याचे स्पष्ट झाले आहे. दूसरीकडे भाजपाने मात्र आपला मित्र पक्ष असलेल्या शिवसंग्रामच्या अपेक्षांना भीक न घालता स्वबळावरच रिंगणात उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकोला जिल्हा परिषदेच्या ५३ व सात पंचायत समितीच्या १०७ जागांसाठी ७ जानेवारीला निवडणुक होऊ घातली आहे. या निवडणुकीत भारिप-बहूजन महासंघ तसेच भाजपाने स्वबळावर उमेदवार उभे केले असून काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसने आघाडी केली आहे तर शिवसेनाही स्वबळावरच रिंगणात उभी आहे. निवडणुक पूर्व या आघाडी पाहता तिरंगी लढतीचे चित्र सर्वच सर्कलमध्ये उभे ठाकल्याचे दिसत आहे मात्र महाविकास आघाडीने अनेक ठिकाणी राज्यातील मैत्रीला जागत आपआपल्या मित्रपक्षांनासोबत घेतल्याचे दिसत आहे. काँग्रेस आघाडीने मुर्तीजापूर तालुक्यात महाविकास आघाडीचा छोटासा प्रयत्न केला आहे. या तालुक्यातील तीन जागा शिवसेनेसाठी सोडल्या असून तेथे काँग्रेस आघाडीचा उमेदवार राहणार नाही. दूसरीकडे शिवसेनेला प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडून यांनी पाठींबा दिला आहे याची जाणीव ठेवत शिवसेनेने प्रहारचे प्राबल्य असलेल्या अकोट मतदारसंघातील दोन जिल्हा परिषद सर्कल व सात पंचायत समिती सर्कल मधील जागा प्रहारला दिल्या आहेत.
काँग्रेस आघाडी व शिवसेनेने आपल्या मित्रांची काही प्रमाणात काळजी घेतल्याचे स्पष्ट दिसत असतानाही भाजपाने मात्र शिवसंग्राम या आपल्या मित्रांच्या मागण्यांची दखल घेतली नसल्याचा आरोप शिवसंग्रामच्या गोटातून होत आहे. शिवसंग्रामने जिल्हा परिषदेच्या चार व पंचायत समितीच्या सात जागांची मागणी भाजपकडे केली होती. बाळापूर व पातुर या दोन तालुक्यातील या जागांवर भाजपाने आपले उमेदवार जाहिर केले असल्याने शिवसंग्रामचा पुन्हा अपेक्षाभंग झाल्याचे स्पष्टच आहे.
प्रहारचे उमेदवार सेनेच्या चिन्हावर
शिवसनेने प्रहार संघटनेसाठी जिल्हा परिषदेचे दोन व पंचायत समितीचे सात मतदारसंघ दिले आहेत. या उमेदवारांना प्रहाराची निशाणी देण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने प्रहारचे संस्थापक आ.बच्च कडू यांनी संमती दिल्यामुळेच प्रहारचे उमेदवार सेनेच्या चिन्हावर रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे अकोट मधील हिवरखेड या जि.प.सर्कल मध्ये मात्र या दोन पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. याबाबत प्रहारचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांना विचारणा केली असता एका सर्कलमध्ये मैत्रीपूर्ण लढतीला त्यांनी दूजोरा दिला.