लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक बंडखोरीचा सामना करावा लागणाऱ्या भारिप-बमसंच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पक्षाचे कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी अपक्ष दाखल केलेले अर्ज मागे घेतले. तर बोरगाव मंजू, राजंदा गटात अपक्षांचे अर्ज कायम आहेत. त्याच वेळी इतर पक्षांच्या एबी फॉर्मवर निवडणूक लढणाºया उमेदवारांचेही व्याळा, कान्हेरी, उगवा, राजंदा गटातील अर्ज कायम असल्याने त्या गटांमध्ये स्वपक्षीयांशी लढत देण्याची वेळ भारिप-बमसंच्या उमेदवारांवर आली आहे. त्याशिवाय, आगर गटात उमेदवार बदलण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. ज्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतले असले तरी त्यांची नाराजी पुर्णत: दुर न झाल्यास त्या नाराजीचे छुपे आव्हानही उमेदवारा समोर कायम राहणार आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एबी फॉर्म वाटप झाल्यानंतर भारिप-बमसंमध्ये मोठ्या बंडखोरी झाली. त्यामध्ये बोरगाव मंजू, बाभूळगाव, हातगाव, व्याळा, भांबेरी, कान्हेरी सरप, उगवा या गटात प्रकर्षाने बंडखोरांची नावे पुढे आली. त्या बंडखोरांची समजूत घालून पक्षाच्या उमेदवारासोबत सहकार्य करण्यासाठी पक्षाने तीन सदस्यांच्या समितीवर जबाबदारी टाकली. समितीने सर्व बंडखोरांशी संपर्क साधत उमेदवारी मागे घेण्याची मनधरणी केली. त्यामध्ये समितीला ७० टक्के अपक्षांची उमेदवारी मागे घेण्यात यश मिळाले. तर इतर पक्षांच्या एबी फॉर्मवर लढणाºयांची उमेदवारी कायम आहे. बोरगाव मंजू गटात भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी संदीप गवई यांच्या पत्नीने अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. उगवा गटात विलास वाघ यांचे अर्ज कायम आहेत.समितीच्या सूचनेनुसार उमेदवारी मागे घेणाºयांमध्ये कान्हेरी सरप गटात विद्या अंभोरे, पिंजर-अनघा ठाकरे, सांगळूद-दिलीप सिरसाट, बोरगावमंजू- ज्ञानेश्वर वानखडे, संजय वानखडे, बपोरी- अंजली देशमुख, सिरसो-कांता सोळंके, विवरा-मंगला इंगळे, चोंढी-दीपक धाडसे, सस्ती-विक्रम हातोले, कुरणखेड-दिनकर नागे, अकोट तालुक्यातून कांतीलाल गहिले, अकोलखेड-डॉ. अनिल गणगणे, निमकर्दा- नितीन मटाले, व्याळा-समाधान सावदेकर, अंदुरा गटातून नीलेश वाकडे, राम सागरकुंडे यांचा समावेश आहे.जामवसूत शिवसेनेची उमेदवारी नाकारलीजामवसू गटात भारिप-बमसंच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी यशपाल जाधव यांनी शिवसेनेची उमेदवारी नाकारली. तर आगर गटातील महिला उमेदवार बोरीकर यांच्याऐवजी माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांच्या स्नुषा चित्रा भांडे यांना उमेदवारी घोषित केली जाणार आहे अशी माहिती सुत्रांनी दिली.
जिल्हा परिषद निवडणूक : अनेकांची उमेदवारी मागे, आव्हान कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:51 AM