अकोला: जिल्हा परिषदेत सत्तेसाठी प्रबळ दावेदार भारिप-बमसंच्या अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष तर काहींनी थेट इतर पक्षांची उमेदवारी मिळवली. त्यामध्ये अनेक पदाधिकारीही आहेत. त्याचवेळी काही मतदारसंघात पक्षाने पार्सल उमेदवार दिले. त्या ठिकाणी स्थानिकऐवजी पार्सल उमेदवारांचा मुद्दा चांगलाच गाजत असल्याने संबंधितांच्या नाकीनऊ आले आहेत. भारिप-बमसंच्या उमेदवारांसमोर पक्षातील बंडखोरांचा सामना करण्याची वेळ आली. त्यांचे बंड शमवण्यासाठी पक्षाने माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे यांच्यावर जबाबदारी दिली. अपक्ष उमेदवार या समितीच्या मनधरणीला किती महत्त्व देतात, यावरच त्यांची उमेदवारी अवलंबून आहे. त्याशिवाय, काही गटात स्वपक्षाच्या उमेदवारालाच आव्हान उभे केल्याने मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांच्यात कोणता समझोता घडवून आणता येईल, यावरही चर्चा सुरूच राहणार आहे.महाविकास आघाडीतही धुसफूसकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेची जिल्हा परिषदेत आघाडी स्थापन झाली नाही. त्याचवेळी मूर्तिजापूर तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट शिवसेनेसाठी सोडण्यात आले. आता त्याच तालुक्यातील इतर गटात या पक्षांचे उमेदवार परस्परविरोधी रिंगणात आहेत. त्यापैकी कोण उमेदवारी मागे घेते, यावरच महाआघाडीचे सामंजस्य दिसून येणार आहे.भारिप-बमसंचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर येत्या १ जानेवारीपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात; मात्र इतर पक्षातून लढणाºया उमेदवारांचे आव्हान कायम राहण्याची शक्यता अधिक आहे.