लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या समाजकल्याण, कृषी विभागाच्या साहित्य वाटप योजना चालू वर्षात नव्याने राबवण्यासाठी स्थायी समितीच्या सभेत शनिवारी मंजुरी देण्यात आली. यावेळी आंतरजिल्हा बदलीने रुजू होणाऱ्या किंवा कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया बिंदूनामावली अंतिम होईपर्यंत थांबवण्याचेही सभेत ठरवण्यात आले. तसेच सदस्य गोपाल कोल्हे यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रमाणेच जिल्हा परिषद सदस्यांनाही कर्जमाफी द्यावी, या मागणीचा ठरावही मांडला. समितीच्या सभेत अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण, सभापती पुंडलिकराव अरबट, देवका पातोंड, रेखा अंभोरे, माधुरी गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी तेल्हारा तालुक्यात एकही घरकुल मंजूर नाही, हा मुद्दा सदस्य गोपाल कोल्हे यांनी मांडला. सोबतच जिल्ह्यात घरकुलाचे ८,०३९ लाभार्थी आहेत. त्यापैकी ७,९०० लाभार्थींना पहिला टप्पा तर १,०२५ लाभार्थींना दुसऱ्या टप्प्याचा धनादेश देण्यात आला. उर्वरित लाभार्थींची घरे आता पावसाळ््यातही अपूर्ण आहेत. या प्रकाराला जबाबदार कोण, हा मुद्दाही कोल्हे यांनी उपस्थित केला. त्यावर प्रकल्प संचालक डॉ. पवार यांनी लाभार्थींच्या अडचणी दूर केल्या जातील, असे सांगितले. तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळी तालुक्यातील शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द केल्यानंतरही त्या ठिकाणीच कार्यरत आहेत, याप्रकरणी स्वत: भेटी देऊन खातरजमा करणार असल्याचे सदस्य शोभा शेळके यांनी सभेत सांगितले. पं.स. स्तरावर पडून असलेल्या पुस्तकांच्या चौकशी अहवालानुसार आता पुस्तके नाहीत, ती कोठे गेली, असा सवालही शेळके यांनी उपस्थित केला.याप्रकरणी शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांनी चौकशी करून अहवाल सादर केला जाईल, असे सांगितले. आंतरजिल्हा बदलीने रुजू होणारे मराठी माध्यमाचे ५८ उर्दू माध्यमांच्या ८ शिक्षकांच्या बदलीबाबतची प्रक्रिया बिंदूनामावली अंतिम होईपर्यंत करू नये, अशी मागणी सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केली.
जिल्हा परिषद सदस्यांनाही कर्जमाफी द्या!
By admin | Published: July 02, 2017 9:37 AM