लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी पाठविलेल्या प्रारूप मतदारसंघ रचनेच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी मंजूरी दिली असून, आता २७ आॅगस्ट रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपणार असून, आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. सन २०११ च्या जनगणनेच्या अनुषंगाने वाशिम तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ वाढला असून, पूर्वीच्या नऊ मतदारसंघातील एक, दोन गावे वगळून दहाव्या नवीन मतदारसंघाची रचना करण्यात आली. पूर्वीच्या काही जिल्हा परिषद मतदारसंघाची नावे ‘जैसे थे’ असून, दहावा नवीन मतदारसंघ तयार करण्यात आला. लोकसंख्या व चक्रानुक्रमानुसार एससी, एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासह जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव १० आॅगस्टला जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. प्रारुप मतदारसंघ रचनेच्या या प्रस्तावास २० आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्तांनी मंजूरी दिली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद गट व पंचायत समितींच्या गणांसाठी २७ आॅगस्ट रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटांसाठीची सोडत २७ आॅगस्ट रोजी वाशिम येथे आयोजित विशेष सभेत होणार आहे. पंचायत समिती गणांसाठीची सोडत संबंधित तालुक्याच्या ठिकाणी काढली जाणार आहे. या विशेष सभेला जिल्ह्यातील मतदारांसह मान्यवरांना उपस्थित राहता येणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ रचनेच्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांची मंजुरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 6:23 PM