अकोला: जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार, २९ जूनपासून सुरू होत आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली असून, उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ आणि सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या
पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २९ जूनपासून सुरू होत आहे. रविवार सुटीचा दिवस वगळता ५जुलैपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार असून, ऑनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रिंट काढून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही तालुकास्तरावर करण्यात आली आहे.
''या''ठिकाणी स्वीकारण्यात येणार उमेदवारी अर्ज!
जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामध्ये अकोला, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यातील उमेदवारी अर्ज तेथील उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये आणि तेल्हारा, बार्शीटाकळी व पातूर या तीन तालुक्यातील उमेदवारी अर्ज संबंधित तहसील कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत.