अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागरचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५३ आणि पंचायत समित्यांच्या १०६ जागांची प्रभागरचना करण्यात येणार असून, आरक्षणाची सोडत २७ आॅगस्ट रोजी काढण्यात येणार आहे. अंतिम प्रभागरचना व आरक्षण २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जाहीर करण्यात येणार आहे.प्रभागरचनेच्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या आरक्षणासह जिल्हाधिकाºयांमार्फत १० आॅगस्टपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास २० आॅगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडून मान्यता देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितींच्या गणांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत २७ आॅक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या गटांसाठी जिल्हाधिकाºयांमार्फत तर पंचायत समिती गणांसाठी तहसीलदारांमार्फत आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. हरकती व सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर १९ सप्टेंबरपर्यंत विभागीय आयुक्तांमार्फत प्रभागरचना अंतिम करण्यात येणार असून, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची अंतिम प्रभागरचना व आरक्षण २५ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.