अकोला: वाडेगाव येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने संलग्नता प्रदान केल्यानंतर आता सिंदखेड मोरेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेलासुद्धा ही संलग्नता मिळाली आहे. यंदा जिल्ह्यातील दोन शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे.डिजिटल शाळेसोबत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता देत, तेथील गुणवंत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भौतिक सुविधा, अभ्यासक्रम, प्रशिक्षित शिक्षक मिळावे, या दृष्टिकोनातून शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ कार्यरत आहे. या मंडळाची संलग्नता देऊन आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देण्यासाठी मंडळाने आॅनलाइन अर्ज मागविले होते. यात जिल्ह्यातील पाच शाळांची मंडळाने निवड केली. या पाच शाळांच्या बाह्य मूल्यांकनासाठी राज्यस्तरीय शाळा मूल्यांकन समितीच्या सहा सदस्यीय चमूने ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान पाच शाळांची तपासणी केली.तपासणीमध्ये वाडेगाव येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेसोबतच, सिंदखेड मोरेश्वर येथील जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा संलग्नतेसाठी आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण केल्यामुळे या शाळेला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने पुढील तीन वर्षांपासून अस्थायी संलग्नता प्रदान केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींना आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार शिक्षण मिळणार आहे. या शाळेमध्येसुद्धा कॉन्व्हेंट सुरू होऊन नर्सरी ते चौथीपर्यंत आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळाल्यामुळे वाडेगाव जि.प. शाळेत आता नर्सरी, केजी-१, केजी-२ पर्यंत कॉन्व्हेंट सुरू होईल. पहिल्या टप्प्यामध्ये नर्सरी ते इ. चौथीतील विद्यार्थ्यांना मंडळाच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार शिक्षण मिळणार आहे.शाळेतील मुलांच्या या परीक्षा होतील!तीन वर्षांमध्ये शाळेला आपली पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या काही परीक्षा होतील. २0२१ ते २0२३ या कालावधीत प्रोग्रेस इंटरनॅशनल रिडिंग लिटरसी स्टडी (पीआयआरएलएस), ट्रेंड्स इन इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स टाइम स्टडी आणि प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट या परीक्षा होतील. शाळेतील विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये टिकण्यास पात्र ठरतील.यामुळे मिळाली संलग्नता!सिंदखेड मोरेश्वर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा लोकसहभागातून डिजिटल झाली. इ. १ ते ७ पर्यंत असलेल्या शाळेत २२२ विद्यार्थी आहेत. एचडीएफसी बँकेच्या १0 लाख रुपयांच्या अर्थसाहाय्यामुळे शाळेत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळालेली सिंदखेड येथील जि.प. शाळा जिल्ह्यात दुसरी आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळेच शाळेला तीन वर्षांसाठी अस्थायी आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळाली.-डॉ. प्रकाश जाधव,प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था.लोकसहभागामुळे शाळेचा विकास झाला. अॅप्रो कंपनीने मदतीचा हात दिल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेसोबत अत्याधुनिक शौचालय, बोलक्या भिंती, वाचनालय, फर्निचर, आरओ प्लांटसारख्या सुविधा उपलब्ध झाल्या. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल वाघ, उपाध्यक्ष शेखर खुणे यांच्यासह ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले.-अरुण वानखडे, मुख्याध्यापक,जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सिंदखेड मोरेश्वर.