- संतोषकुमार गवई लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : बालपणापासून बचतीची सवय लागावी यासाठी सावरखेड जिल्हा परिषद शाळेत बाल बचत बँक सुरू करण्यात आली आहे. या बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे कामकाज विद्यार्थीच सांभाळत असून, ३२ खातेदार आहेत.विद्यार्थ्यांना बचत करण्याची सवय लागावी या हेतूने दुर्गम आदिवासी पाड्यातील सावरखेड जिल्हा परिषद शाळेत बचत बँक सुरू करण्यात आली आहे. या बँकेच भागभांडवल २ हजार रुपये आहे. व्यवहारासाठी प्रत्येकाचे स्वतंत्र पानावर व्यवहार लिहिला जातो. शाळेतील एक खिडकी बँकेप्रमाणे करण्यात आली आहे. खिडकीच्या पलीकडे इयत्ता चौथीतील शिवाणी अवधूत देवकर ही रोखपाल म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहे. बँकेचे व्यवहार दर शनिवारी होत असल्याने खातेदार चिमुकल्यांची पैसे जमा करणे आणि काढण्यासाठी रांग लागते. या पैशातून विद्यार्थी वही, पेन इत्यादी साहित्य खरेदी करतात. त्यामुळे त्यांना बालपणापासून बचतीची सवय झाली आहे. त्याबरोबरच बँकिंगचे व्यवहार बालपणात समजू लागले आहेत. प्रयोगातून विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा, असा या येथील दोन शिक्षकांचा उद्देश आहे. शाळा मुख्याध्यापक डी. के. पडघन, सहायाक शिक्षककैलास पडघन अनेकविध उपक्रम राबवत आहेत.
बचतीची लागली सवयआदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे पालक मोलमजुरी करून उपजीविका भागवतात. ही मुले खाऊसाठी मिळालेले पैसे बँकेत टाकतात. तसेच शालेय साहित्य खरेदीसाठी या पैशांचा वापर करतात. या व्यहारातून त्यांना पैशांची बचत करण्याची सवय लागली आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.