अकोला: जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘सीसी कॅमेरे’ लावण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील पंचायत समित्यांकडून ११ सप्टेंबरपर्यंत २५ शाळांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत.जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण यासंदर्भात माहिती उपलब्ध व्हावी तसेच शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्यादृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून २५ लाख रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘सीसी कॅमेरे ’ लावण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील पंचायत समित्यांकडून शाळांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ११ सप्टेंबरपर्यंत २५ शाळांचे प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. उर्वरित शाळांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यामधून सीसी कॅमेरे लावण्यासाठी जिल्ह्यातील शाळांची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यासोबतच जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या कामांचे शाळानिहाय प्रस्तावदेखील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत मागविण्यात आले आहेत.जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘सीसी कॅमेरे ’ लावण्यासाठी शाळांचे प्रस्ताव मागविण्यात आले असून, आतापर्यंत २५ शाळांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांमधून सीसी कॅमेरे लावण्यासाठी जिल्ह्यातील शाळांची लवकरच निवड करण्यात येणार आहे. यासोबतच शाळांमध्ये पाणी पुरवठ्याच्या उपाययोजनांची कामे केली जाणार आहेत.-चंद्रशेखर पांडे गुरुजीसभापती, शिक्षण व बांधकाम, जिल्हा परिषद.