अकोला: जिल्हा परिषद परिसरातील विविध कार्यालयांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी सोमवारी सकाळी पाहणी केली. त्यामध्ये कार्यालयांच्या परिसरात रस्त्यांवर उभ्या वाहनांतील हवा काढण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हा परिषद परिसरातील विविध विभागाच्या कार्यालयांची पाहणी केली. पाहणीदरम्यान विविध विभागाच्या कार्यालयांसमोर रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी वाहने उभी करण्यात आल्याचे आढळून आले. ‘पार्किंग’च्या ठिकाणांऐवजी कार्यालयांच्या परिसरात रस्त्यांवर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांतील हवा काढण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिले. त्यानुसार जिल्हा परिषद परिसरात विविध विभागांच्या कार्यालयांच्या समोर रस्त्यांवर उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांमधील हवा काढण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सूरज गोहाड, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अघम व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.