अकोला : गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने साथरोग व इतरही समस्या उद्भवत आहेत. त्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांनीही यंत्रणा सज्ज ठेवावी, असा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके यांची नियंत्रण समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने विविध उपाययोजना गावांमध्ये तयार ठेवाव्या. त्यामध्ये आरोग्य यंत्रणेने १०८ रुग्णवाहिकांची व्यवस्था विशेषता पूरग्रस्त भागात करावी, त्या भागात साथरोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात सर्व प्रकारच्या औषधी उपलब्ध ठेवाव्या. त्यामध्ये सर्पदंश, मलेरिया, डायरिया, डेंग्यूवर उपचाराच्या औषधी असाव्या, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, शिक्षणाधिकाºयांनी जिल्हा परिषदेच्या शाळा उपलब्ध करून द्याव्या, आपत्ती व्यवस्थापनासाठी ग्रामपातळीवरील कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्यात याव्या, या कामासाठी एका लिपिकाची समन्वयक म्हणून नियुक्ती करावी, असेही आदेशात म्हटले आहे.आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचनांनुसार काम करावे, प्रशासनाच्या मदतीला जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची यंत्रणा तयार ठेवावी, असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिला आहे.