अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण कार्यक्रमात जिल्हा परिषदेला मंजूर असलेल्या ८ कोटी ८४ लाख ६४ हजार रुपयांच्या निधीपैकी ३ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीतून बाळापूर तालुक्यातील तीन रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) देण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव जितेंद्र पापळकर यांनी २० जानेवारी रोजी दिला. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेत रस्ते कामांसाठी जिल्हा परिषदेला मंजूर असलेल्या निधीपैकी ३ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीतील तीन रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहेत.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषदेला ८ कोटी ८४ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ३ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीतून बाळापूर तालुक्यातील तीन रस्त्यांची कामे सार्वजिनक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे देण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव जितेंद्र पापळकर यांनी दिला.
बाळापूर तालुक्यातील ‘या’ तीन रस्तेकामांचा आहे समावेश!
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत ग्रामीण रस्तेविकास व मजबुतीकरण कार्यक्रमात जिल्हा परिषदेला मंजूर निधीपैकी ३ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीतील तीन रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामध्ये बाळापूर तालुक्यातील धनेगाव जुने ते धनेगाव नवे ग्रामीण मार्ग, पातूर ते भंडारज ग्रामीण मार्ग व सोनुना ते पांढुर्णा ग्रामीण मार्ग इत्यादी तीन रस्तेकामांचा समावेश आहे.