अकोला: येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटांची रचना करताना अकोला पंचायत समितीमध्ये आधीच्या १४ ऐवजी १० गट तयार होत आहेत. सभागृहात सदस्य संख्या कायम ठेवण्यासाठी अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, पातूर या पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेचा प्रत्येकी एक गट तर पंचायत समितीचे दोन गण वाढवण्यात आले आहेत.राज्यातील चार जिल्हा परिषदेची मुदत डिसेंबर २०१८ मध्ये संपुष्टात येत आहे. त्या निवडणुकीसाठी २०११ मध्ये केंद्र शासनाने केलेल्या जनगणनेतील लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. त्याच वेळी अकोला शहरालगतची २४ गावे महापालिकेत समाविष्ट झाली. त्या गावांची एकूण १ लाख ३३ हजार ६१३ एवढी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येतून कमी झाली. त्याचा फटका अकोला पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद गटांची रचना करताना बसला आहे. त्यामुळेच आधी १४ जिल्हा परिषद सदस्य आणि २८ पंचायत समिती सदस्य असलेल्या या पंचायत समितीमध्ये केवळ १० जिल्हा परिषद आणि २० पंचायत समिती सदस्यांची निवड होणार आहे. त्याच वेळी अकोट व तेल्हारा तालुक्यात मेळघाटातून पुनर्वसित झालेल्या गावांची लोकसंख्या वाढली आहे. त्याचा फायदा त्या पंचायत समित्यांमध्ये झाला. जिल्हा परिषदेच्या आधीच्या सातऐवजी आता आठ सदस्य निवडले जाणार आहेत, तर पंचायत समित्यांमध्ये प्रत्येकी दोन गण वाढले आहेत. मूर्तिजापूर, पातूरमध्येही प्रत्येकी एक जिल्हा परिषद गट वाढल्याने दोन पंचायत समिती गणही वाढले आहेत. त्यामुळे अकोला तालुक्यातून वजा झालेले जिल्हा परिषदेचे चार गट इतर चार पंचायत समितीमध्ये वाढवून सदस्य संख्या कायम ठेवण्यात आली आहे.जिल्हा परिषदेत महिलांची संख्या एकने अधिकजिल्हा परिषद सभागृहात ५३ पैकी २७ सदस्य महिला राहणार आहेत. त्यांची संख्या निवडणूक आयोगाने ठरवून दिली. त्यामध्ये सर्वसाधारण गटासाठी असलेल्या २२ पैकी ११ महिला, अनुसूचित जातींच्या १२ पैकी ६, अनुसूचित जमातींच्या ५ पैकी ३, नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या १४ पैकी ७ जागा महिलांसाठी आहेत. त्यासोबतच पंचायत समित्यांच्या १०६ पैकी ५३ जागा महिलांसाठी आहेत. अनुसूचित जातींसाठी जिल्ह्यात राखीव एकूण २५ पैकी १५ महिलांसाठी, खुल्या प्रवर्गातील ४४ पैकी १७, अनुसूचित जमातींच्या ९ पैकी ६, नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या २८ पैकी १५ जागा महिलांसाठी राखीव होणार आहेत. त्याचा फटका जिल्हा परिषदेच्या आखाड्यातील अनेक दिग्गजांना बसणार आहे.