- संतोष येलकर
अकोला: जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील कोणतीही कामे प्रलंबित राहू नयेत, वेळेवर आणि योग्यरीत्या कामे पूर्ण करण्यासाठी आठवड्यातील दर सोमवारी विभागप्रमुखांच्या बैठकीत कामाचा लेखाजोखा घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयुष प्रसाद गत आठवड्यात रुजू झाले. गेल्या आठवडाभराच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत कारभाराची माहिती त्यांनी घेतली. जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, विकासकामांसह प्रशासकीय स्तरावरील जिल्ह्यातील कोणतीही कामे प्रलंबित राहू नयेत, कामे विहित वेळेवर तातडीने आणि योग्य रीतीने पूर्ण झाली पाहिजे, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागांमध्ये समन्वय असावा, यासाठी आठवड्यातील प्रत्येक सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख आणि पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये विभागनिहाय कामाचा आढावा घेण्यात येणार असून, कामांतील अडचणींची माहिती घेत, प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची कामे मार्गी लागतील!जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासकामांसह सर्वसामान्यांच्या तक्रारींचा आढावादेखील दर सोमवारी आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांची कामे तातडीने मार्गी लागतील, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.जि.प. नवीन इमारत बांधकामासाठी पाठपुरावा!जिल्हा परिषदेच्या नवीन इमारत बांधकामासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच पदाधिकारी-अधिकारी आणि कर्मचाºयांच्या समन्वयातून जिल्हा परिषदेत चांगले वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानसही ‘सीईओ’ आयुष प्रसाद यांनी बोलून दाखविला.