अकाेला : कोरोना संक्रमणाच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढीसाठी इतर पोषक घटकांप्रमाणे शरिरातील झिंकच्या प्रमाणालाही महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्याने झिंक पुरवठा करणारी औषधे घ्यावी तसेच झिंकयुक्त आहारावर भर द्यावा, असे तज्ज्ञ सांगतात. कोरोना संक्रमणाची एकूण स्थिती पाहता, सध्या रोगप्रतिकारकशक्ती सशक्त ठेवणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे आहार, व्यायाम आणि दिनचर्येमधून रोगप्रतिकारक यंत्रणा मजबूत ठेवण्यावर लोकांचा भर आहे. यामध्ये इतर जीवनसत्वांबरोबर झिंकची भूमिकाही महत्त्वाची आहे. झिंकमधील रोगप्रतिकारकशक्तीला पोषक गुणधर्मांमुळे विषाणूजन्य प्रादुर्भावाशी लढण्याची मानवी शरिरात शक्ती वाढते. शिवाय झिंकचे गुणधर्म हे सर्दीची तीव्रता आणि कालावधीही कमी करतात, असेही अभ्यासक सांगतात. त्यामुळे पुरेशा प्रमाणात झिंक शरिराला मिळाल्यास कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाविरोधात लढण्यास अतिरिक्त रोगप्रतिकारकशक्ती तयार होते, असे डाॅक्टर सांगतात. सामान्यपणे भूक कमी होणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, वाढ मंदावणे, केसांची गळती, जखम बरी होण्यास उशीर लागणे, वजन कमी होणे, चवीचे ज्ञान कमी होणे आदी लक्षणे झिंकच्या कमतरतेशी संबंधित असू शकतात, असेही तज्ज्ञ सांगतात.
झिंक काय करते?
तज्ज्ञ सांगतात की, गर्भधारणा किंवा बाल अवस्थेतील वाढ, शरिराचा विकास यासह चव आणि गंधाची योग्य जाण ठेवणे, शरिरावरील जखम भरून काढण्यात मदत करणे आणि प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम झिंक करते.
हे आहेत स्रोत
तृणधान्यात नाचणी, बाजरी, डाळी व कडधान्यांमध्ये हरभरे, चवळी, राजमा, सोयाबीन, सुका मेव्यात बदाम, काजू, तीळ, खोबरे, शेंगदाणे यातून झिंक मिळते. मांसाहारही झिंकचा स्रोत आहे. बटाटा, रताळे यातूनही झिंक मिळते.
शरिराचे पोषण, वाढ आणि रोगप्रतिकारकशक्तीच्या वाढीसाठी सर्वच घटक महत्त्वाचे असतात. त्यामध्ये झिंकचाही महत्त्वपूर्ण रोल आहे. त्यामुळे आपला आहार हा चौरस असलाच पाहिजे शिवाय त्याला योग्य व्यायामाची जोड असली पाहिजे.
- डाॅ. श्यामकुमार सिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी