अकोला: जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड गुरुवार, ३0 जून रोजी बोलावण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत करण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मित्र पक्षांसह अपक्षांच्या पाठिंब्याने विद्यमान सत्ताधारी भारिप-बहुजन महासंघाने दोन्ही पदावर दावा केला आहे. तर भारिप-बमसंला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना -भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांसह महाआघाडीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तनाच्या पर्यायासाठीदेखील प्रयत्न सुरू झाले आहेत. पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. त्यामध्ये दोन्ही पदांसाठी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत सदस्यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून, त्यानंतर दुपारी ३ वाजता सुरू होणार्या विशेष सभेत जिल्हा परिषद व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार या विशेष सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे काम पाहणार आहेत. शिवसेना-भाजप युतीसह काँग्रेस आणि भारिप- बमसंच्या स्थानिक नेत्यांची बैठका पार पडल्या असून, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदांच्या निवडीसंदर्भात समीकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या विद्यमान सत्ताधारी भारिप-बमसंकडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व एक अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषदेत पुन्हा सत्ता स्थापन्याचा दावा करण्यात आला. तर भारिप-बमसंला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भारिप वगळता शिवसेना-भाजप युतीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन अपक्ष सदस्यांना सोबत घेऊन, महाआघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तनासाठी हालचालींनाही गती आली. परंतू, कोणा-कोणाची वर्णी लागणार, याबाबतचे चित्र गुरुवारी होणार्या विशेष सभेनंतरच स्पष्ट होणार आहे.
जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीचा आज फैसला!
By admin | Published: June 30, 2016 1:56 AM