लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी मान्य न झाल्याने शाळा व्यवस्थापन समितीने १७ जुलै रोजी शाळेलाच कुलूप ठोकून आंदोलन केले. या आंदोलनाचीही शिक्षण विभागाने दखल घेतली नाही.खंडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक वरिष्ठ शाळेत २३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पटसंख्येनुसार या शाळेवर उच्च श्रेणी मुख्याध्यापकांसह नऊ शिक्षकांची आवश्यकता आहे. येथील शाळेवर कार्यरत नऊ शिक्षकांपैकी दोन शिक्षकांना जुलै २०१५ पासून प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले आहे. यामधील संजय वानखडे हे मूळ शाळेवर रुजू झाले आहेत. ही शाळा केंद्र शाळा असल्यामुळे येथे अतिरिक्त शिक्षकसुद्धा नियुक्त करण्याची गरज आहे. मात्र, येथील शिक्षकांना वेळोवेळी दुसऱ्या शाळेवर किंवा पंचायत समिती कार्यालयात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात येते. या शाळेवर कायमस्वरूपी शिक्षक देण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी करून मागणी मान्य न झाल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. १७ जुलैपर्यंतही मागणी मान्य न झाल्याने शाळा व्यवस्थापन समितीने सोमवारी शाळेला कुलूप ठोकले. यावेळी केंद्रप्रमुखांनी तुम्हाला शिक्षक मिळणार,असे शाळा व्यवस्थापन समितीला सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संतोष मोरे यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांनी शाळेला भेट देऊन अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. या शाळेमध्ये १० ते १५ आदिवासी गावातील मुले आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचे आंदोलन सुरू असताना शिक्षण विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने भेट दिली नाही. शिक्षक मिळेपर्यंत शाळेचे कुलूप काढणार नसल्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संतोष मोरे यांनी दिला आहे.
जि.प. शाळेला ठोकले कुलूप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:24 AM