अकोला: शहरातील मोठ्या नाल्यांची मान्सूनपूर्व साफसफाई करण्यासाठी प्रशासनाने झोन अधिकाऱ्यांना अग्रीम रकमेचे वाटप केल्यानंतर नाले सफाईच्या कामाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. यावर्षी एक मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या नाल्यांची सफाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी दिला असून, यामुळे नाले सफाईच्या माध्यमातून होणाºया खाबुगिरीला काही अंशी आळा बसेल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.मनपा आयुक्त संजय कापडणीस यांचे मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे धोरण असले तरी त्यांच्या उद्देशाला काही अधिकारी व कर्मचाºयांनी केराची टोपली दाखवली आहे. मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा, बाजारपेठ, खुली मैदाने तसेच प्रभागांमध्ये दैनंदिन साफसफाई होणे अपेक्षित असताना प्रभागात पंधरा-पंधरा दिवस सफाई कर्मचारी फिरकत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे प्रभागात ठिकठिकाणी काटेरी झुडपे वाढली असून, नाल्या-गटारे घाणीने तुडुंब साचली आहेत. संपूर्ण शहरातील चित्र पाहता, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि संबंधित नगरसेवकांच्या कार्यशैलीवर अकोलेकर प्रश्न उपस्थित करीत आहेत. वर्षभराच्या कालावधीत नाले सफाईकडे ढुंकूनही पाहिल्या जात नाही. परिणामी लहान-मोठे नाले घाणीने गच्च भरले आहेत. नाले सफाईच्या नावाखाली लाखो रुपयांची देयके उकळण्याची कामे होत असल्याने यावर्षी किमान एक मीटरपेक्षा मोठ्या नाल्यांची सफाई करण्याचा निर्णय आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतला असून, तसे निर्देश क्षेत्रीय अधिकाºयांना दिले आहेत.नाले सफाईला सुरुवात; मनपासमोर आव्हानमहापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी नाले सफाईसाठी पूर्व झोनकरिता ६ लाख रुपये व इतर तीन झोनसाठी प्रत्येकी ५ लाख रुपये अग्रीम रक्कम दिली आहे. त्यानुसार प्रत्येक झोनमध्ये नाले सफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. ही अग्रीम संपताच झोन अधिकाऱ्यांना दुसºया टप्प्यासाठी आणखी रक्कम दिली जाईल; परंतु कमी अवधीत संपूर्ण शहरातील नाले सफाईची कामे पार पडतील का, असा सवाल उपस्थित होत आहे.