मुंबई - अकोला जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत, अकोट तालुक्यातील कुटासा येथील लढत चांगलीच गाजली. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना मोठा धक्का बसला आहे. येथून राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार स्मृती गावंडे विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार छबुताई राऊत या त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात होत्या. त्यानंतर, पालकमंत्र्यांनी जी छुपी युती केली, त्याचा महाविकास आघाडी सरकारने विचार करणे आवश्यक आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
प्रहार पक्षाला 78 मतं आहेत, राष्ट्रवादीला 978 मत आहेत. मी स्थानिक विकासकामं केली नसती तर, लोकांनी राष्ट्रवादीलं मत दिलं नसती. भाजपचे आज 1800 मत कमी झाले आहेत, त्याचा फायदा प्रहारला झाला. त्यामुळेच, प्रहार पक्ष निवडणूक जिंकला. काही जागांवर बच्चू कडूंनी स्वबळाचा नारा दिला तरी त्यांना एकच जागा जिंकता आली. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला, त्यांना जागा वाढवता आल्या नाहीत किंवा कमीही करता आल्या नाहीत. राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र लढली, राष्ट्रवादीच्या दोन जागा वाढल्या, वंचितच्या दोन जागा शिवसेनेमुळे कमी झाल्या, तसेच, भाजपच्याही 2 जागा राष्ट्रवादीमुळे कमी झाल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले.
अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादीनं चांगलं यश मिळवलंय. माझ्या सर्कलमध्ये पराभव झाला असला, तरी राष्ट्रवादीला 2250 मत आहेत. पालकमंत्र्यांनी भाजपसोबत छुपी युती केली, त्याचा महाविकास आघाडी सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी विनंतीही अमोल मिटकरी यांनी केली आहे. सर्वांनी एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे, महाविकास आघाडी एकत्र आली नाही, तर आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये, फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये आपल्याला अपयश येऊ शकतं, असे स्पष्ट मत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं आहे.
बच्चू कडूंनी हातमिळवणी केल्याचा आरोप
कुटासा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांचे गाव आहे. आमदार झाल्यापासून अमोल मिटकरी यांनी कुटासा गावातच सर्वाधिक निधी दिल्याचे समजते. यामुळे येथील निवडणूक ही मिटकरी यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. येथे आमदार मिटकरी आणि पालकमंत्री बच्चू कडू यांच्यात थेट सामना बघायला मिळाला. मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांच्यावर थेट निशाणा साधला होता. पालकमंत्री बच्चू कडू यांनी कुटासा जिल्हा परिषद गटात भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी यांनी केला होता.
पक्ष, उमेदवार आणि मिळालेली मते -
प्रहार जनशक्ती पक्ष - स्फूर्ती निखील गावंडे - 2597वंचित बहुजन आघाडी - सुलता शिवदास बुटे - 2378राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - छबूताई गजाननराव राऊत - 2127भाजप - कोमल गोपाल पोटे - 1873इंडियन नॅशनल काँग्रेस - अर्चना संतोष जगताप - 1647
राज्यातील सहा जिल्हा परिषदांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीपैकी सर्व ८५ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये, ४६ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या ८५ पैकी काँग्रेसने १७, राष्ट्रवादीने १७ आणि शिवसेनेने १२ अशा मिळून महाविकास आघाडीने आतापर्यंत ४६ जागा जिंकल्या. तर भाजपाने २३ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित १६ जागा इतर पक्षांच्या खात्यात गेल्या आहेत.
राज्यातील निवडणूक निकाल
जिल्हावार आकडेवारीनुसार अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ पैकी १४ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसच्या खात्यात प्रत्येकी १ तर राष्ट्रवादीच्या खात्यात दोन जागा गेल्या आहेत. तर ९ जागांवर वंचित आणि इतर पक्षांनी बाजी मारली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील ११ पैकी ११ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपाने ४, शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी ३ तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला आहे. धुळे जिल्ह्यातील १५ पैकी १५ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपाने ८, राष्ट्रवादीने ३, काँग्रेसने २ आणि शिवसेनेने दोन जागेवर विजय मिळवला आहे.
नागपूर जिल्ह्यातील १६ पैकी १६ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये ९ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. तर भाजपाने तीन आणि राष्ट्रवादीने दोन जागांवर विजय मिळवला. उर्वरीत २ जागांवर इतरांनी बाजी मारली.
वाशिममधील १४ पैका १४ जागांचे निकाल हाती आले असून यामध्ये राष्ट्रवादीने ५, काँग्रेस आणि भाजपाने प्रत्येकी २, शिवसेनेने १ आणि इतरांनी ४ जागांवर कब्जा केला.
तर पालघरमध्ये १५ पैकी १५ जागांचे निकाल हाती आले असून, येथे भाजपा आणि शिवसेनेने प्रत्येकी ५ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आहेत. तर एक जागा इतरांच्या खात्यात गेली आहे.