जि.प. निवडणूक : महाविकास आघाडीची बिघाडी; चौरंगी लढतीचे चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:16 AM2019-12-22T11:16:40+5:302019-12-22T11:16:49+5:30
काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडी निवडणूक लढवित असून, शिवसेना स्वतंत्रपणे लढणार आहे.
अकोला: अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत महाविकास आघाडी स्थापन करण्याची तयारी शनिवारी सायंकाळच्या बैठकीनंतर बिघडली. काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडी निवडणूक लढवित असून, शिवसेना स्वतंत्रपणे लढणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी एकत्र येण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. निवडणुकीच्या रिंगणात आता वंचित बहुजन आघाडी, भाजप, शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असे प्रमुख चार पक्षांचे उमेदवार असल्याने जिल्ह्यात चौरंगी लढत पाहावयास मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गत दोन दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात अस्तित्वात आलेल्या राष्टÑवादी व काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीचा राज्यातील प्रयोग जिल्हा स्तरावरही करण्यासाठी १५ डिसेंबर रोजी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी गठित करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. त्यामध्ये आघाडी करण्यावर एकमत झाले होते. त्या दृष्टिकोनातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल व राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान आपापल्या प्रदेशाध्यक्षांना जिल्ह्यातील स्थितीचा आढावा दिला होता.
या दोन्ही जिल्हाध्यक्षांना महाविकास आघाडीला प्राधान्य देत जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार शनिवारी झालेल्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीत महाविकास आघाडीची निर्मिती निवडणुकीपूर्वी न करता निकाल घोषित झाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी एकत्र येण्यावर एकमत झाले. त्यासाठी शिवसेना स्वतंत्रपणे सर्वच गट आणि गणांमध्ये उमेदवारांना रिंगणात उतरविणार आहे, अशी भूमिका मांडत बैठक पार पडली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार रिंगणात राहतील.
स्थानिक नेत्यांच्या बैठकीत निर्णय
शनिवारी सायंकाळी काँग्रेस नेत्याच्या कार्यालयात तीनही पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे नेते प्रा. वसंत पुरके, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, सुनील धाबेकर, राष्ट्रवादीचे डॉ. संतोषकुमार कोरपे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख, उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर व सेवकराम ताथोड उपस्थित होते.
काँग्रेस-राकाँचा २७-२५ चा ‘फॉर्म्युला’
५३ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे चार व राष्टÑवादीचे दोन सदस्य विजयी झाले होते. यावेळी काँग्रेस २७ व राष्टÑवादी २५ जागांवर निवडणूक लढविणार असून, एका जागेवर मैत्रीपूर्ण लढत करायची असे ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा ‘फॉर्म्युला’ ठरविण्यात आला.