खड्डा बुजवला!
अकोला : श्रीवास्तव चौक ते डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या मार्गावर कामगार कल्याण मंडळासमोर मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यामुळे दुरुस्तीसाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता. हा खड्डा बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
पथदिवे बंद
अकोला : मुख्य मार्गावरील पथदिवे सुरू राहत असल्याचा दावा मनपाकडून केला जातो. मात्र, खदान पोलीस ठाणे ते निमवाडी लक्झरी बस स्टॅण्ड मार्गावरील पथदिवे बंद असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता, मनपाने तातडीने पथदिवे सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
नळजोडणी वैध करा!
अकोला : शहराच्या विविध भागांत अवैधरीत्या नळजोडणी घेतली जात आहे. हा प्रकार मनपा जलप्रदाय विभागाच्या निदर्शनास येत असल्याने, नागरिकांनी नळजोडणी वैध करण्याचे आवाहन जलप्रदाय विभागाच्या वतीने केले जात आहे, अन्यथा नळजाेडणी खंडित करून दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
ऑटाेमुळे वाहतूक विस्कळीत
अकोला : सकाळी ८ ते दुपारी ३ या कालावधीत टाळेबंदी शिथिल हाेताच, शहरातील मुख्य रस्त्यांवर ऑटो चालकांच्या मनमानीमुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. थांबा नसताना जागा दिसेल, त्या ठिकाणी ऑटो उभे केले जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
डासांची पैदास वाढली
अकोला : शहरातील नाले-गटारांची नियमित साफसफाई होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी हिवताप विभागाने धुरळणी करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यांवर मातीचे ढीग
अकोला : शहरातील मुख्य रस्त्यांची झाडपूस केल्यानंतर साचणाऱ्या मातीची विल्हेवाट न लावता, मनपाचे सफाई कर्मचारी दुभाजकांलगत मातीचे ढीग लावत असल्याचे दिसून येते. वाहनांमुळे दिवसभर मातीचा धुराळा उठत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
भटक्या कुत्र्यांचा उच्छाद
अकोला : शहराच्या विविध भागांत भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. वाशिम बायपास चौकातील कमलानगर व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. वाहनचालकांना रात्री या भागातून प्रवास करणे मुश्कील झाले आहे. मनपाने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.
सातव चाैकात खाेदला खड्डा
अकाेला : शहरातील सातव चाैकात मुख्य जलवाहिनीचा व्हाॅल्व बसविण्यासाठी कंत्राटदाराकडून दाेन ठिकाणी भलेमाेठे खड्डे खाेदण्यात आले आहेत. रस्त्यालगत खड्डे असल्यामुळे कंत्राटदाराने सुरक्षेसाठी कठडे लावणे अपेक्षित हाेते. तसे न केल्यामुळे वाहनचालकांच्या जीविताला धाेका निर्माण झाला आहे.