अकोला : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) दिलेल्या आदेशानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत विविध प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, शनिवार व रविवारी या सुटीच्या दिवशीही प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे कामकाज सुरु होते.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शाळा व शिक्षणासंबंधी पालकांसह विद्यार्थ्यांच्या तक्रारी तसेच लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्रांची उत्तरे तसेच लेखा आक्षेपांची पूर्तता अशा प्रकारची विविध प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याच्या मुद्यावर नाराजी व्यक्त करीत, जोपर्यंत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होत नाही तोपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन त्यांचे वेतन थांबविण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना २१ जून रोजी दिला होता. त्यानंतर प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे काम सुरु करण्यात आले असून, शनिवार व रविवारी शासकीय सुटीच्या दिवशीदेखील प्राथमिक शिक्षण विभागात प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे कामकाज संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरू होते.