अमरावती : जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या वादळाचा सर्वात जास्त फटका महावितरणला बसला आहे. अनेक भागांमध्ये झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडल्याने शेकडो गावातील वीज पुरवठा खंडित झाला. या पावसामुळे ८१४ वीज खांब कोसळले असून ६० किलोमीटर पर्यंतच्या विद्युत वाहिन्या क्षतीग्रस्त झाल्या आहेत. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा चांदूर बाजार आणि भातकुली तालुक्यात बसला असून जवळपास १.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. यामध्ये महावितरणलाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. आकाशातील वीज आणि महावितरणची वीज यंत्रणा यामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन अनेक वीज वाहिन्यावरील इन्सुलेटर फुटले तसेच उपकेंद्रात तांत्रिक दोष निर्माण झाले. याचबरोबर काही ठिकाणी वादळाच्या प्रचंड दबावामुळे झाडे उन्मळून वीज वाहिन्यावर पडली होती. परिणामी महावितरणची ९ उपकेंद्रे आणि ३७ फिडर पूर्णत: बंद पडले होते. चांदूर बाजार परिसरात महावितरणचे उच्चदाबाचे २४१ आणि लघुदाबाचे ४२४ वीज खांब कोसळले. यामुळे साडेसतरा किलोमीटर उच्चदाब आणि ३० किलोमीटर लघुदाबाच्या वीज वाहिन्या क्षतिग्रस्त झाल्या. त्याचबरोबर ५ रोहित्रात तांत्रिक दोष निर्माण होऊन नादूरुस्त झाले. तर ४ रोहित्रे जमिनीवर खाली पडून नुकसान झाले. तसचे भातकुली परिसरातही ३३ उच्चदाबाचे आणि ७९ लघुदाबाचे वीज खांब कोसळले असून ९ किमी वीज वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. अचलपूर विभागात उच्च आणि लघुदाब वर्गवारीतील ३२ वीज खांब कोसळले असून २ किलोमीटर वीज वाहिन्या क्षतिग्रस्त झाल्या आहेत. तसेच दोन रोहित्रे नादुरुस्त झाली आहेत. तर अमरावती शहरात ७ वीजेचे खांब कोसळले असून १ रोहित्र खाली पडले आहे. ३ रोहित्रात तांत्रिक दोष निर्माण होऊन निकामी झाले झाल्यामुळे महावितरणला १.२५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याठिकाणचा वीज पुरवठा झाला सुरळीतवादळ थांबताच महावितरणने टप्प्या- टप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु केले. जेथे शक्य झाले त्या ठिकाणी उपकेंद्राला बॅक फिडींगने वीज पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेल्या ३३ केव्ही पाडा, ३३ केव्ही घाटलाडकी, ३३ केव्ही खोलापूर,३३ केव्ही आमला,३३ केव्ही ब्राम्हणवाडा,३३ केव्ही तोंडगाव, ३३ केव्ही खल्लार,३३ केव्ही चांदस वाटोडा आणि ३३ केव्ही टाकरखेडा या उपकेंद्राचा आणि त्या उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या तसेच या उपकेंद्रातून वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या ३७ वीज वाहिन्यांचा बंद पडलेला वीज पुरवठा सुरु करण्यास महावितरणला यश आले आहे.