लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा, मू्ल्यांकन, निकाल आदी प्रक्रिया पूर्णत्वास नेली. आता परीक्षेपासून दूर असलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या नियोजनाची तयारी आरंभली आहे. विद्यापीठांतर्गत १.२० लाख विद्यार्थी असल्याची नाेंद आहे.अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल या आठवड्यात संपुष्टात येणार आहे. मात्र, अंतिम वर्षात पोहोेचले. पण, प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्र परीक्षा दिल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तयारी चालविली आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे स्वरूप, मूल्यांकन, निकाल आदी बाबी कशा पद्धतीने असाव्यात, यासाठी अगोदर विद्वत परिषद, परीक्षा मंडळ आणि त्यानंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्यात येणार आहे. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यांतील सुमारे १.२० लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येईल. परीक्षांचे वेळापत्रक, केंद्र, प्रश्नपत्रिका, मूल्यांकन, निकाल आदी बाबींचे नियोजन विद्यापीठ स्तरावर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. परीक्षा विभागाने त्यानुसार तयारी सुरू केली आहे.
डिसेंबर महिन्यात परीक्षा होण्याचे संकेतप्रथम, द्वितीय, तृतीय व चौथ्या सत्राच्या परीक्षांना विविध प्राधिकरणांनी मान्य दिल्यानंतर डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, असे नियोजन सुरू झाले आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील आदींच्या मार्गदर्शनात परीक्षाबाबत तयारी करण्यात येणार आहे. व्यवस्थापन परिषदेत सर्वांगीण चर्चा झाल्यानंतर या परीक्षांवर शिक्कामोर्तब केले जाईल. परीक्षांचे वेळापत्रक, स्वरूप, निकाल, मूल्यांकन आदी निश्चित केले जाईल.
अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथे सत्राच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे. परीक्षा महाविद्यालय स्तरावर होतील, असे संकेत आहे. परीक्षांसाठी पूरक साहित्य विद्यापीठाकडून पुरविण्यात येतील.हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ.