अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवार १ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. यंदा दहावीचे अमरावती विभागात १ लाख ६४ हजार ४७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये ८७ हजार ६७७ मुले तर ७६ हजार ३६१ मुली या परीक्षेला परीक्षार्थी आहेत.
विभागीय शिक्षण मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार दहावीच्या परीक्षांसाठी विभागीय शिक्षण मंडळाने यंदा आवश्यक तयारी व उपाययोजना केलेल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहावी परीक्षेत दरवर्षी कॉपी केसेससारख्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत.
मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार एक ते २६ मार्चदरम्यान दहावीची शालांत परीक्षा घेणार येणार आहे. विभागात या परीक्षेसाठी ७१७ परीक्षा केंद्र निश्चित केले आहेत. या परीक्षेत १ लाख ६४ हजार ४७ विद्यार्थ्यांमध्ये ८७ हजार ६७७ मुले तर ७६ हजार ३६१ मुली परीक्षा देणार आहेत. दहावीचा पहिला पेपर भाषेचा (मराठी) आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत या परीक्षेत पेपरच्या वेळेनंतर विद्यार्थ्याना दहा मिनिटे अधिक वेळ देण्यात येईल.
परीक्षेदरम्यान कॉपी किंवा अन्य गैरप्रकार होऊ नयेत. यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि परीक्षा मंडळाच्या अंतर्गत ही पथके काम करतील. याशिवाय विविध परीक्षा केंद्रांवर बैठी पथकेदेखील परीक्षा केंद्रावर वॉच ठेवणार आहेत.
जिल्हानिहाय विद्यार्थीजिल्हा - दहावीअकोला - २५,८५८अमरावती - ३९,३३७बुलढाणा - ४०,२५९यवतमाळ - ३८,५६५वाशिम - २०,०२८एकूण १,६४,०४७