नालेसफाई केव्हा ? : पूरसदृश विभागासाठी आश्रयस्थानही अमरावती : अंबानगरीतील अंबानालासह लहान मोठ्या नाल्यांमुळे साडेतेराशे घरांना पुराचा फटका बसू शकतो, अशी भीती महापालिका यंत्रणेत व्यक्त केली आहे. मान्सून तोंडावर असतानाही नाले सफाईने फारसा वेग न घेतल्याने पुराचा धोका संभवतो. हा धोका टाळण्यासाठी महापालिकेत आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्ती उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला असून त्यात पूरसदृश भागाची नोंद आली आहे. अतिवृष्टिमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीतून अनेकवेळा आप्तग्रस्तांना सुरक्षितस्थळी पाठवावे लागते, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आली आहे.शहरात अंबानाल्यासह १३ मोठे नाले व १७ लहान नाल्यांसह १७४ लहान-मोठे नाले वाहतात. साधारणत: अंबानाला, महादेवखोरीनाला, छत्री तलाब नाला, बडनेरा आणि दलेलपुरी नाल्याला पूर येतो व सभोवताली नागरिकांना अतिवृष्टी व पुराचा धोका संभवतो. नाल्यातील गाळ आणि कचरा जैसे थे राहल्याने नाल्याला पूर येतो व ते पुराचे पाणी नाल्याच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरात शिरते. अंबानाला व दलेलपुरी नाला कधी कधी आक्रामीकाळ रूप धारण करतो. ते परिस्थिती टाळण्यासाठी दरवर्षी आपात्कालीन कक्ष स्थापन केला जातो. मात्र पूर परिस्थिती हा कक्ष नेहमीच ‘नॉट रिचेबल’ राहिल्याची परंपरा आहे. यंदा तर तो आपत्कालीन कक्ष २४ बाय ७ सुरू राहावा, अशी अमरावतीकरांची अपेक्षा आहे. बिच्छूटेकडी, फ्रेजरपुरा, किशोर नगर, बेलपुरा, तारासाहेब बगिचा, नमुना, अंबादेवी परिसर, जोडमोट, आनंदनगर, महाजनपुरा, हनुमान नगर व हैदरपुऱ्याला अंबानाल्याचा धोका ठभवतो. तसेच अमर कॉलनी, जलारामनगर, राजापेठ, प्रमोद कॉलनीजवळील झोपडपट्टी, बजरंग टेकडी, पन्नालाल नगर, पन्नालालनगर झोपडपट्टी, गटी धनगर या भागांना महादेवखोरी नाल्याच्या पुराचा धोका संभवतो. त्याचबरोबर जेवड झोपडपट्टी, चक्रधरनगर झोपडपट्टी, नवाथेनगर झोपडपट्टी, इंदिरा गांधी नगर, (दुर्गाविहार), रविनगर व जयगुरुनगरला छत्री तलावाचा तर जुनी वस्ती, नवी वस्ती, बडनेरा या भागांना पुराचा धोका असतो. याशिवाय अशोकनगर, आझादनगर, हबीबनगर, जमील कॉलोनी, छाया नगर, रहेमतनगर, फारुखनगर व अलीमनगर या भागाला दलेलपुरी नाल्याचा फटका बसू शकतो. आयुक्तांसह १७ सदस्यीय समिती नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती हाताळ्यासाठी आयुक्त हेमंत पवार यांच्यासह १७ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
शहरातील १ हजार ३५४ कुटुंबीयांना पुराचा धोका !
By admin | Published: June 15, 2016 12:24 AM