अनुसूचित जाती शेतकऱ्यांना लाभ : आॅगस्ट अखेरपर्यंत प्रस्तावाची मुदतअमरावती : शासनाच्या विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये यंदा घसघशीत वाढ करण्यात आली आहे. यंदा १० कोटी ४६ लाखांचा निधी जिल्ह्यासाठी उपलब्ध आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांना दारिद्र्यरेषेवर आणण्यासाठी शासनाद्वारा विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या गटाला कृषी विकासासाठी अर्थसहाय्याच्या माध्यमातून १०० टक्के अनुदानावर शेती औजारे खरेदी, विहीर खोदकाम यांसह अन्य बाबींसाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे. यामध्ये शेती सुधारणा, खते, बियाणे, किटकनाशके, शेतीची सुधारित अवजारे, बैलजोडी, बैलबंडी, जुन्या विहिरींची दुरुस्ती, पाईपलाईन, शेततळे आदी साहित्य अनुदानावर मिळणार आहे. मागील वर्षी अडीच हजार शेतकऱ्यांना किमान सहा कोटींचा लाभ देण्यात आला होता. यंदा मात्र या योजनेच्या निकषात बदल करण्यात आले आहे. शेती औजारासाठी अनुदानाची मर्यादा ५० हजार व नवीन विहीर खोदकामासाठी तीन लाखांचे अनुदान मिळणार आहे. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची मर्यादा एक लाखापर्यंत करावी, अशी मागणी होती. यावर जिल्हा परिषदेचा विचार सुरू आहे. लाभार्थींना साहित्याचे वाटप केल्यानंतर ‘यशदा’द्वारे त्याची तपासणी केली जाणार आहे. आॅगस्ट अखेर प्रस्तावाची मुदत आहे.
‘विशेष घटक’साठी जिल्ह्यात १० कोटी
By admin | Published: August 11, 2016 12:07 AM