परीक्षा मंडळाचा निर्णय. एका परीक्षेत ६०० अभ्यासक्रम अन् १२ लाख पेपर
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विषय प्राध्यापक असलेल्या व्हॅल्युअरच्या कामांचे मोल जोपासले असून, पेपर तपासणीकांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करून ते १० टक्के वाढविले आहे. येत्या परीक्षांपासून व्हॅल्युअरला प्रतिपेपर १० टक्के वाढ मिळेल, असा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे.
अमरावती विद्यापीठात एका परीक्षेसाठी ६०० अभ्यासक्रम, तर १२ लाख पेपरचे नियोजन करण्यात येते. साधारणत: सहा हजार व्हॅल्युअर पेपर तपासणीचे कर्तव्य बजावतात, अशी माहिती आहे. मात्र, गत काही वर्षांपासून पेपर तपासनिसांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी, अशी सातत्याने विषय प्राध्यापकांची मागणी होती. त्याअनुषंगाने गत आठवड्यात परीक्षा मंडळांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत व्हॅल्युअरला प्रति पेपर १० टक्के वाढ देण्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले. अमरावती विद्यापीठात १२, १५ आणि १८ रूपये असे प्रति पेपर मानधन दिले जात होते. आता हिवाळी २०२० नियमित, बॅकलॉग परीक्षांपासून या मानधनात १० टक्के वाढ मिळणार आहे. परीक्षा मंडळाने १० टक्के वाढ देण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाला व्यवस्थापन परिषदेत मान्यता मिळणे अनिवार्य आहे.
------------
बीपीई प्रात्यक्षिकाचे शुल्क झाले कमी
अमरावती विद्यापीठाने बीपीई अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिकांचे शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रति प्रात्यक्षिक आता केवळ ५० रुपये आकारले जाणार आहे. अगाेदर बीपीईच्या ४ ते ५ प्रात्यक्षिकांसाठी ४१० रुपये शुल्क घेण्यात येत होते. आता प्रति प्रात्यक्षिक ५० रुपये शुल्क लागेल, असा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे.
---------------
गत काही वर्षांपासूनची व्हॅल्युअरची मागणी परीक्षा मंडळाने पूर्णत्वास आणली आहे. प्रति पेपर १० टक्के वाढ झाल्याने त्यांना समाधानकारक मानधन मिळेल. या निर्णयाची अंमलबजावणी व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर होईल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ