सराफा दुकान फोडले : ऑटोमोबाईल दुकानातही चोरी
बाहेरच्या पानासाठी
मोर्शी : तालुक्यातील अंबाडा गावात सोमवारी पहाटे २ च्या सुमारास सराफा दुकान फोडून तब्बल १० किलो चांदीसह रोख व सोन्याच्या दागिने असा आठ ते नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याच वेळेला गावातील एक ऑटोमोबाईल दुकान फोडून दुचाकीचे टायर, ऑईल असे ४० हजार रुपयांचे साहित्य लंपास करण्यात आले. मोर्शी पोलिसांनी सोमवारी दुपारी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले.
अंबाडा येथील गुजरी बाजारात अक्षय खांडेकर यांच्या मालकीचे राधाई ज्वेलर्स हे सराफा प्रतिष्ठान आहे. दुकानाचे काम सुरू असल्याने शेजारच्या गाळ्यात व्यवसाय थाटला होता. रविवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी परतले. सोमवारी पहाटे २.४० च्या सुमारास सचिन पिसे नामक व्यक्तीने त्यांना त्यांच्या सराफा दुकानात कुणीतरी शिरल्याची माहिती दिली. खांडेकर तेथे येईपर्यंत चोरटा पसार झाला होता.
चोराने त्यांच्या सराफा दुकानातून सात लाख रुपये किमतीची १० किलो चांदी, ३४ हजार ७०० रुपये रोख व १० ते १२ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार खांडेकर यांनी मोर्शी पोलिसांना दिली. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी सकाळी अकोला येथून श्वानपथक दाखल झाले तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय ज्लीस अधिकारी कविता फडतरे यांनी भेट दिली. पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन भोंडे व अन्य कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.
अंबाडा येथील घाटलाडकी मार्गावरील दीपक पिसे यांच्या मालकीचे दीपक ऑटोमोबाईल नामक प्रतिष्ठान फोडून तेथून टायर ट्यूब व अन्य साहित्य चोरून नेल्याचा प्रकार उघड झाला.
----------------------------------