अचलपूर : पारंपरिक शेती न करता आधुनिक प्रयोगशील व बाजारपेठ मागणीनुसार शेतीतून १०० दिवसांत एका एकरात १० लाखांपेक्षा अधिक टोमॅटोचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. ही किमया अचलपूरच्या अब्बासपुरा येथील अतुल लकडे या शेतक-याने साधली आहे. अब्बासपुरा अचलपूर येथील युवा शेतकरी अतुल पुरूषोत्तमराव लकडे (३० वर्षे) यांनी यावर्षी एका एकरात टोमॅटोची लागवड केली. साधारणत: जुलै महिन्यात टोमॅटो बियाणे आणून रोपे तयार करून शेतात झिकझॅक पद्धतीने मल्चिंग टाकून लागवड केली. ५ फूट बाय २ बेड अशा पद्धतीने साधारणत: दीड फूट अंतरावर दोन रोपांची लागवड केली. तसेच ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे व खताचे नियोजन केले. ५० टक्के रासायनिक व ५० टक्के सेंद्रिय पद्धतीची औषधे त्यांनी वापरली. सहा वेळा जीवामृत झाडांना दिले तर पांढरी माशी, तुरतुडे यांचा बंदोबस्त करण्याकरिता ५० पिवळे ट्रॅप या टोमॅटोच्या शेतात बसविले होते.या एका एकरात लकडे यांना दोन हजार कॅरेट टोमॅटोचे उत्पादन झाले. परतवाडा, अंजनगाव या बाजारपेठेमध्ये या टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी होती. ६५० ते १५०० रूपये प्रति कॅरेट दर लकडे यांना मिळाले. आजही या टोमॅटोचे उत्पादन सुरूच आहे. बी-बियाणेपासून तर मजुरी, फवारणी, खत, टोमॅटोचे झाडे बांधणे, फळे सोडणे, निंदण यासाठी एका एकरात सरासरी दोन लक्ष रूपये खर्च त्यांना आला. खर्च वजा करून अतुल लकडे यांना एका एकरात जवळपास ११ लाखांचे उत्पन्न टोमॅटोने मिळवून दिले. युवा शेतक-यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार तसेच पारंपरिक शेती न करता अत्याधुनिक आधुनिक शेती करावी.- अतुल लकडे,शेतकरी
एका एकरात दहा लाखांचे टोमॅटो; शेतकरी अतुल लकडे यांची यशोगाथा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 4:40 PM