गजानन मोहोड
अमरावती : चार दिवसांतील मुसळधार पाऊस व अतिवृष्टी यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरात १० व्यक्ती वाहून गेल्या व लहानमोठे २०३ पशुधन मृत झाले. पुराच्या पाणी शेतात शिरल्याने, शेतात तलाव साचल्याने व बांध फुटल्यानेही २.२६ लाख हेक्टरमधील कपाशी, तूर व सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्तांचा अहवाल आहे. या आपत्तीमध्ये पश्चिम विदर्भात ३३ तालुक्यांतील १६१७ गावे बाधित झालेली आहेत.
विभागामध्ये ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात १४ तालुके, बुलडाणा ३ व वाशिम जिल्ह्यात १ अशा २० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. शिवाय कित्येक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात ११२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे.या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना आलेल्या पुरात अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यांत प्रत्येकी २, बुलडाणा ३ व वाशिम जिल्ह्यात १ अशा १० व्यक्ती पुरात वाहून गेल्याने मृत झाल्या आहेत. शिवाय ३५ मोठे व १६८ लहान अशा २०३ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. या आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात ६६५, वाशिम १५६, अकोला ८२ व बुलडाणा जिल्ह्यात २६ घरांची पडझड झालेली आहे.
पुराने शेती खरडली, शेतांचे झाले तलावचार दिवसांतील मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे २,२६,०६६ हेक्टरमधील कपाशी, तूर व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात १,७१,६०६ हेक्टर, अकोला ४१,८८०, बुलडाणा ११,६००, अमरावती ५५७ व वाशिम जिल्ह्यात ४०७ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. शासनादेशानुसार अतिवृष्टीने बाधित पिकांचे सर्वेक्षण कृषी व महसूल यंत्रणांद्वारा करण्यात येत आहे.