उपक्रम : ‘न्यायालय आपल्या दारी’ संकल्पना बडनेरा : मागील चार महिन्यांपासून बडनेरात न्यायालयाच्या माध्यमातून रेल्वेच्या प्रकरणांचा निपटारा केला जात आहे. मंगळवार ८ नोव्हेंबर रोजी एकूण १०० खटल्यांचा निपटारा करण्यात आला. ‘न्यायालय आपल्या दारी’ हा उपक्रम रेल्वेच्या प्रकरणांसाठी राबविला जात आहे. याचा मोठा दिलासा किरकोळ खटल्यातील आरोपींना मिळत आहे. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने किरकोळ खटले तत्काळ निकाली काढण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘न्यायालय आपल्या दारी’ हा उपक्रम राबविणे सुरू केले. असाच उपक्रम मागील चार महिन्यांपासून रेल्वे विभागाकडून बडनेरात राबविला जात आहे. रेल्वेच्या हद्दीत घडणाऱ्या किरकोळ खटल्यांचा निपटारा यापूर्वी भुसावळ किंवा शेगाव येथेच होत होता. बडनेरा रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक सी.एस.पटेल यांनी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून हे न्यायालय बडनेरातच भरविण्याची विनंती केली होती. त्यानुसार दर महिन्यातून एकदा न्यायालय चालविले जाते. सोमवारी येथे १०० खटल्यांचा निपटारा करण्यात आला. यात ‘नो-पार्किंग’च्या २७, रेल्वे क्रॉसिंगच्या ४०, अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या १३ रेल्वे गाडीच्या महिला डब्यात बसून जाणाऱ्या चार इसमांवर कारवाई, चैन पुलिंग करणाऱ्जा दोन, तृतियपंथीयांच्या आठ कारवाया तसेच विकलांग किंवा मालवाहू वॅनमधून प्रवास करणाऱ्या १२ प्रकरणांचा असे मिळून १०० खटल्यांवर सुनावणी करून निपटारा करण्यात आला. यासाठी भुसावळचे एक न्यायाधीश व इतर न्यायालयीन कर्मचारी येथे आले होते. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक सी.एस. पटेल, उपनिरीक्षक पी.के.गुप्ता, सोगरनसिंग इतर कर्मचारी मिश्रा, शेरखान, विठोबा मरसकोल्हे, शेख आसिफ, संतोष शेटे, सोनल इंगळे, विजय इंगळे, महेश शेंडे, चंदेल व डांगे यांचा सहभाग होता. (शहर प्रतिनिधी)
मंगळवारी रेल्वे न्यायालयात १०० प्रकरणांचा निपटारा
By admin | Published: November 10, 2016 12:29 AM