पान १ साठी
ना. उदय सामंत यांनी केले १० कोटींचे अनुदान मंजूर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आता स्वायत्त
अमरावती : शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था २०२२-२३ मध्ये शंभर वर्षे पूर्ण करीत आहे. शताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयाने विकासकामांसाठी १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. राज्य शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे दिली.
ना. सामंत यांनी येथील विदर्भ शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच परिसरात वृक्षारोपण केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आता महाविद्यालय स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन विकासकामे करतील. त्यांना आता मंत्रालयाच्या परवानगीची गरज राहणार नाही. महाविद्यालयाने उपकेंद्राच्या माध्यमातून आपल्या कक्षा वाढवाव्यात. उपकेंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी तंत्रशिक्षण सहसंचालक तथा तंत्रनिकेतनचे प्राचार्य आर.पी. मोगरे, उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.पी. बोरकर, शासकीय विदर्भ ज्ञान-विद्यान संस्थेचे संचालक वसंत हेलावी रेड्डी, औषधनिर्माणचे प्राचार्य एस.एस. खडबडी, अधिष्ठाता एस.डी. लोंढे आदी उपस्थित होते.
-----------------
शासनाचे तंत्र विद्यापीठ स्थापन
राज्य शासनाने तंत्र विद्यापिठ स्थापन केले आहे. इतर विद्यापीठांशी संलग्न होण्यापेक्षा तंत्र विद्यापीठाशी संलग्नता तसेच इतर बाबींसाठी पाठपुरावा करावा. विभागाने अनुकंपा तत्वावरील भरतीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. या नियुक्त्या तातडीने करून यातील प्रतीक्षा यादी शून्यावर आणावी. तंत्र शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा, यासाठी विद्यार्थी संपर्क अभियान उपयुक्त ठरले. गेल्या वर्षात ६९० कोटींची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. येत्या काळातही शिष्यवृत्तीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे ना. सामंत म्हणाले.
-------------------
उच्च शिक्षण विभाग एक दिवस अमरावतीत येणार
येत्या महिन्यात उच्च शिक्षण विभागातर्फे ‘उच्च शिक्षण ॲट अमरावती’ हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच प्रशासन सहभागी होईल. हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. यात मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी आणि स्थानिक यांच्यात समन्वय साधण्यात येणार आहे. प्रत्येकाची समस्या ऐकून घेऊन त्याचे जागीच निराकरण करण्यात येणार आहे.
--------------