लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रातील १०० इमारती शिकस्त असल्याची नोंद असून त्याइमारती धोकादायक झाल्या आहेत. पावसाचे पाणी मुरल्यानंतर त्या कधीही कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्या इमारती पाडण्यासाठी ना संबंधित इमारत मालकांनी पुढाकार घेतला ना महापालिका प्रशासनाने. त्यामुळे एखादा अपघात झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मुंबईमध्ये घाटकोपर (पश्चिम) येथील ‘साईदर्शन’ ही चार मजली इमारत मंगळवारी पत्त्यासारखी कोसळली. हाच धागा पकडून शहरातील अशा धोकादायक इमारतींची माहिती मनपा प्रशासनाकडून घेतली असता झोन क्र. ३ वगळता अन्य ४ झोनमध्ये तब्बल १०० इमारती शिकस्त असल्याची नोंद आढळून आली. त्यातील अनेक इमारत मालकांना नोटीस देण्यात आल्यात. त्यात तीन महिन्यांच्या आत इमारतींची योग्य ती दुरूस्ती करावी आणि सदर इमारत राहण्यायोग्य असल्याचा दाखला महापालिकेकडे सादर करावा, असे सुचविले. नोटीसप्रमाणे कार्यवाही न केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच इमारत पाडल्यास किंवा त्या इमारतीमुळे नुकसान झाल्यास होणाºया जीवित व वित्तहानीस सर्वस्वी इमारत मालक जबाबदार असल्याचा दम त्या नोटीसमधून दिला आहे. मात्र, त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. अनेक इमारती अतिशय शिकस्त झाल्या असतानाही पाच वर्षानंतर सुद्धा महापालिका केवळ नोटीसची औपचारिकता करीत आहे.काही शिकस्त इमारतींचे ‘लोकमत’ने सर्वेक्षण केले असता त्यातील अनेक इमारती कधीही पडू शकतात व मोठी हानी होऊ शकते. नोटीस बजावल्यानंतर सात दिवसांत कारवाई अपेक्षित आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून केवळ नोटीसांचा पाहुणचार पालिकेकडून सुरू आहे. कारवाई मात्र शून्य असल्याचे दिसून येते. ही बाब अतिशय धोकादायक असल्याने यावर महापालिकेने गांभीर्याने कारवाईची गरज आहे.या आहेत जीर्ण इमारती व धारकसुरवई बिल्डिंग-इतवारा बाजार ,दीपक गुप्ता-मसानगंज,हिंदू बाल अनाथालय-राजकमल चौक,पुरणचंद हबलाणी-आराधना साडी, सी.एल.खत्री-खत्री कंम्पाऊंड,श्री रामजी राठी सार्वजनिक ट्रस्ट वाडा-कासट बिल्डिंग, बालकृष्ण लालजी मंदिर ट्रस्ट-भाजीबाजार चौक, सत्यनारायण मंदिर ट्रस्ट-रंगारी गल्ली, सत्यविजय संस्थान-सक्करसाथ, चेतनदास बालाजी ट्रस्ट व रामप्यारी मंदिर ट्रस्ट जवाहर गेट,व्यंकटेश बालाजी ट्रस्ट धनराज लेन ,रामचंद्र दीक्षित चॅरिटेबल ट्रस्ट इंद्रभूवन गल्ली.पाच इमारती १०० वर्षे जुन्याबडनेरा झोनमधील हुकूमचंद जैन, अरूण मोतीरामजी, इंदिराबाई छाजेड नवीवस्ती, सूर्यकांत पटेल नवीवस्ती आणि किशोरभाई हिरालाल खरैय्या यांच्या मालकीच्या इमारती तब्बल १०० वर्षे जुन्या आहेत. त्यांना १३ मार्च २०१६ ते २१ जुलै २०१६ दरम्यान नोटीस देण्यात आल्यात.
१०० इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 9:56 PM
महापालिका क्षेत्रातील १०० इमारती शिकस्त असल्याची नोंद असून त्याइमारती धोकादायक झाल्या आहेत.
ठळक मुद्दे नोटीस बजावून मोकळे : कधीही होऊ शकते मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती