अमरावती: उत्पन्नाचे स्रोत नसल्याने सहकाराचा मूळ पाया असलेल्या सेवा सहकारी सोसायट्या डबघाईस आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने १५० वर वस्तू व सेवा देण्याला मुभा दिलेली आहे.
यानुसार जिल्ह्यात १०० सोसायट्यांना भारतीय बीज निगमचा परवाना, चार संस्थांना जेनेरिक व नऊ सोसायट्यांंमध्ये सीएससी सेंटर मिळाल्याने सक्षमीकरण होऊन पहिल्या टप्प्यातील २१४ सोसायट्या आता मालामाल होणार आहेत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २१४ सोसायट्यांचा समावेश असल्याचे जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी सांगितले.
या सर्व सोसायट्यांना त्यांची माहिती व तांत्रिक माहिती ऑनलाइन भरावी लागत आहे. मात्र, यामध्ये पोर्टलची मंदगती असल्याने खोडा होत आहे. जिल्ह्यात ६०१ सेवा सहकारी सोसायट्या आहेत. यामध्ये तुरळक अपवाद वगळता अन्य सोसायट्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार देणेही कठीण असल्याची स्थिती आहे