लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग झपाटल्यागत कामाला भिडला आहे. यासंदर्भात व्हीसीद्वारे नियमित आढावा अन् जिल्हधिकाऱ्यांच्या बैठकी सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या प्राथमिक नियोजनानुसार जिल्ह्यात लसीकरणासाठी प्रत्येकी सहा सदस्यांची १०० पथके राहणार आहेत. हे प्राथमिक नियोजन असल्याने यामध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.यासंदर्भात जिल्ह्याचा व महापालिका स्तरावर टास्क फोर्स तयार करण्यात आले व दोन्ही पथकांची पहिली आढावा बैठक झालेली आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम आरोग्य विभागाच्या २० ते २१ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लस साठवणुकीकरिता शीतकरण केंद्र तयार करण्याचे व लसीकरणासाठी केंद्र तयार करण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. यासोबतच पहिल्या टप्प्यात ज्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचा डेटा संगणकात एंट्री करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे सध्या मायक्रो प्लाॅनिंग सुरू आहे. लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी, एनएम, एएनएम, एमपीडब्लू याशिवाय आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर याशिवाय खासगी डॉक्टर व त्यांचा स्टॉफ यांची माहिती संकलित करण्यात आलेली आल्याची माहिती सीएस डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिली.
सर्व टीम मेंबरना प्रशिक्षणलसीकरणासाठी जिल्ह्यात १०० टीम तयार करण्यात आल्या व या पथकांमध्ये ६०० सदस्य राहणार आहे. यामध्ये एक डॅाक्टर, दोन एएनएम, एक मोबलायझर,एक अटेंडंट व एक सुरक्षा रक्षक राहणार आहे. या सर्व सदस्यांना प्राथमिक स्वरूपात लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात येईल. लस कोणती येणार व लसीकरण कसे करणार, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.
२१ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लसकोरोना संर्सगाचे काळात फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणारे आरोग्य विभागाचे २० ते २१ हजार कर्मचाऱी व खासगी आरोग्य सेवा देणारे डॉक्टर यांना सर्वप्रथम लस देण्यात येणार आहे. खासगी क्षेत्रातील कोरोना वॉरिअर्सची माहिती संकलित करायला वेळ लागल्याने ही माहिती संगणकात भरण्यासाठी आता वेळ लागत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.