जितेंद्र दखने, अमरावती: कोविडच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदा यंदा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली आहे. यंदा जिल्ह्यातील संवर्ग १ ते ६ मधील १ हजार ०१७ गुरुजींच्या बदल्या झाल्या असून, बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीचा आदेश सोमवार २२ मे रोजी माध्यानंतर जारी केले जाणार आहेत. संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बदलीने पदस्थापना दिलेल्या शाळेवर रूजू व्हावे लागणार आहे.
येत्या २२ मे रोजी बदली झालेल्या शिक्षकांना जुन्या शाळेतून कार्यमुक्त होऊन नव्या शाळेत रुजू होण्याचे आदेश दिले जाणार आहेत. नियुक्तीचे ठिकाण मिळणार असून बदली झालेल्या शिक्षकांना नव्या शैक्षणिक वर्षापासून नवीन ठिकाणी गुरुजी हजर होणार आहेत. आधी कोविडमुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या लांबल्या होत्या. त्यानंतर ऑनलाईन बदलीसाठी तयार करण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरसाठी एक वर्षाचा कालावधी लागला. त्यानंतर अनेक संकटांची मालिका पार करत अखेर गुरुजींच्या बदल्या झाल्या आहेत. बदली झालेल्या शिक्षकांना त्यांच्या बदलीची ऑनलाईन ठिकाणाची माहिती मिळालेली आहे; मात्र प्रत्यक्षात सोमवारी शिक्षकांना बदलीचे आदेश देण्यात येणार आहेत. यामुळे बदली झालेल्या शिक्षकांचा जीव अखेर भांड्यात पडला आहे.
प्रभारी सीईओंकडून कार्यमुक्त करण्याचे आदेश जारी
जिल्ह्यातील तब्बल १ हजार १७ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या शिक्षकांना कार्यमुक्ती आणि रुजू होण्याचे आदेश मिळणार आहेत. यामध्ये १ ते ६ बदली संवर्गामधील जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचे आदेश १९ मे रोजी प्रभारी सीईओ संतोष जोशी यांच्या स्वाक्षरीने जारी केले आहेत.
अशा झालेल्या बदल्या
संवर्ग एक-२४०संवर्ग दोन -१९२संवर्ग तीन -१६संवर्ग चार -२५९संवर्ग पाच -०५संवर्ग- सहा ३०६एकूण- १०१७
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील १०१७ शिक्षकांची जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेत बदली झालेली आहे.या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी शुक्रवारी दिले आहेत. त्यानुसार सोमवार पासून सबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करून लगेच दुसऱ्या दिवशी नवीन शाळेवर रूजृ व्हावे लागणार आहे. -प्रिया देशमुख, शिक्षणाधिकारी प्राथमिक