लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोपामुळे खरीप हंगाम उद्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, अटी-शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात यंदा नोव्हेंबर महिन्यापर्यंत अस्मानी व सुलतानी संकटामुळे १०२२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. दर सात तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.दुष्काळ, नापिकी, यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, मुला-मुलींचे विवाह, शिक्षण आदी विवंचनेमुळे जगावे कसे? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी लाभापासून वंचित राहत आहे. दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात नोव्हेंबर २०१८ पर्यंत १५ हजार ७२३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये सात हजार ५७ प्रकरणे पात्र, आठ हजार ४७० अपात्र, तर १९६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुर्देवी आहे. २००१ मध्ये ५२ प्रकरणे होती. २०१६ मध्ये १२३५, तर गतवर्षी ११७६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे. यंदा जानेवारी महिन्यात ९८, फेब्रुवारी ८४, मार्च ९६, एप्रिल ७८, मे ८४, जून ८६, जुलै ८९, आॅगष्ट १०६, सप्टेंबर १०४, आॅक्टोबर १०३ व नोव्हेंबर महिन्यात ८५ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.१७ वर्षांत १५,७२३ शेतकरी आत्महत्यागेल्या १७ वर्षांत विभागासह वर्धा जिल्ह्यात १५,७२३ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये अमरावती विभागात १४ हजार ०९२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३,५४५, अकोला २,२१५, यवतमाळ ४,१८२, बुलडाणा २,६६३, वाशिम १,४८७ व वर्धा जिल्ह्यात १,६३१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.वरवरचे उपचार नको, कायमस्वरूपी हवेतराज्यात शेतकरी आत्महत्याप्रवण असणाऱ्या १४ जिल्ह्यासाठी आघाडी सरकारने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास या मिशनला पूर्णपणे अपयश आले आहे. यावर कायमस्वरुपी उपाय होणे गरजेचे आहे.
अस्मानी, सुलतानी संकटाचे अमरावती विभागात १०२२ शेतकरी बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:48 PM
अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात यंदा नोव्हेंबर महिन्यापर्यंत अस्मानी व सुलतानी संकटामुळे १०२२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. दर सात तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील वास्तवदर सात तासांत एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला