अमरावती : प्रशासनाचा पावसाळ्याला १ जूनपासून सुरु झाल्याने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात ६१ नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. याशिवाय पावसाळ्यात नदी-नाल्याच्या काठावरील १०२८ गावे प्रभावित होत असल्याने सर्व नियंत्रण कक्ष २४ बाय ७ सुरु राहून व प्रशासन अलर्ट मोडवरआहे.
यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ४८२ गावे, बुलडाणा २८६, यवतमाळ १६९, अकोला ७७ व वाशिम जिल्ह्यात १४ गावे पुरप्रवण आहेत. या भागातील ८.१२ लाख नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १४२८ तात्पुरते निवारे तयार असल्याचे प्रशासनाने सांगितले. याशिवाय २६ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. विभागातील ३८८ मंडळातील हवामान केंद्राद्वारे पर्जन्यमानाची नोंद घेतल्या जाणार आहे.
आपत्तीचा सामना करण्यात विभागात १६ रबरीबोट, चार फायबर बोट, ८२१ लाईफ जॅकेट, ११४०० मीटर रोप बंडल व १६९८ प्रशिक्षित मनुष्यबळ तयार आहेत. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे पाचही जिल्ह्यात १२६२ बेड तयार ठेवण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अमरदीप चोरपगार यांनी दिली.
स्ट्रक्चरल ऑडिट, १५ दिवसांत मागितला अहवाल
पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी. जुने रस्ते,पूल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी यंत्रणेला दिले. त्यांनी ३१ मे रोजी विभागातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला.