अमरावती : महावितरणकडून सध्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महावितरणचे अधिकारी, कर्मचारीही ग्राहकांच्या घरी जाऊन थकीत बिल वसूल करत आहेत. परिमंडळ कार्यालयांतर्गत अमरावती व यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये १०५ कोटी ३२ लाख रुपयांचे वीज बिल थकीत असून, हे बिल वसूल करण्यासाठी केवळ दहा दिवसांचाच अवधी उरला आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी स्वत वीज बिल वसुली मोहिमेमध्ये सहभागी होत, ग्राहकांना बिल भरण्याचे आवाहन केले.
मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे. त्यामुळे या महिन्यात दिलेल्या उद्दिष्टानुसार परिमंडळांतर्गत अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांतील विविध वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून १७७ कोटी ८४ लाख रुपयांचे थकीत वीज बिल वसूल करणे होते. त्यानुसार मागील वीस दिवसांमध्ये केवळ ७२ कोटी ५२ लाख रुपयांचे बिल वसूल झाले असून, उर्वरित १०५ कोटी ३२ लाख रुपये वसुलीसाठी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात परिमंडलात विभाग, उपविभाग, शाखा कार्यालयानुसार वीज बिल वसुली मोहीम तीव्र करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत महावितरण कर्मचारी हा ग्राहकांच्या दारापर्यंत जाऊन वीज बिल भरण्याचा आग्रह धरत आहे, तसेच वीज बिल भरण्याला प्रतिसादच देत नसेल, तर त्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालकांनी दिले आहेत. बुधवारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी, प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता हरीश गजबे, सुनील शिंदे आदी वीज बिल वसुली मोहिमेत सहभागी झाले होते.