अमरावती : तिसऱ्या लाटेनंतर माघारलेल्या कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. शुक्रवारी १२, तर जून महिन्यात एकूण १०६ संक्रमितांची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात कोरोना हळूहळू पाय पसरू लागल्याने नागरिकांनी कोरोना अनुरूप वर्तनाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये कोरोनाचे जनुकीय उत्परिवर्तन होऊन तयार झालेल्या ओमायक्रॉन या विषाणूमुळे तिसऱ्या लाटेचे संकट ओढावले होते. या लाटेत दीड महिन्यात सात हजार कोरोनाग्रस्तांची नोंद झाली व या दरम्यान दहा रुग्णांचा मृत्यू देखील झाला होता. त्यानंतर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर संसर्ग माघारला होता. मात्र, जून-जुलै महिन्यात संसर्ग वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली होती. त्यामुळे शासनाद्वारा १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर भर देण्यात आलेला आहे.
शुक्रवारी १२ कोरोनाग्रस्तांची नोंद
शुक्रवारी नवसारी येथील ३२ वर्षीय, गोपालनगरातील ६२ व ६५ वर्षीय, राजापेठ ठाण्यामागील ३८ वर्षीय, साईनगरातील ४० वर्षीय, बालाजी प्लॉट येथील ४० वर्षीय, प्रतीक्षा केशव कॉलनीतील ३४ वर्षीय, कॅम्प रोडवरील ३७ वर्षीय व ३९ वर्षीय पुरुष व सातुर्णा येथील ४० वर्षीय महिला, तसेच चांदूर बाजार येथील ८२ वर्षीय पुरुष व माहुली येथील १४ वर्षीय बालिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सद्यस्थितीत मनपा क्षेत्रात १६ व ग्रामीणमध्ये २४ असे एकूण ४० सक्रिय रुग्ण आहेत.
बीए-२ व्हेरिएंटमुळे वाढला संसर्ग !
काही नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुणे येथील एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये ओमायक्राॅनचा सबव्हेरिएंट असलेल्या बीए-२ या विषाणूचा अहवाल प्राप्त असल्याचे विद्यापीठ लॅबचे समन्वयक डॉ. प्रशांत ठाकरे यांनी सांगितले. या विषाणूमुुळेच जिल्ह्यात संसर्ग वाढल्याची शक्यता आहे.