संजय खासबागे
पान २ ची लिड
वरूड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आता नागरिकांच्या मुळावर उठला आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच असून नागरिक सुद्धा सैराट होऊन रस्त्यावर अकारण फिरताना दिसून येतात. लॉकडाऊन व संचारबंदीचा शहरासह तालुक्यात फज्जा उडाला आहे. बुधवारच्या चाचणी अहवालात वरूड व तालुक्यात तब्बल १६७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. पैकी वरूड शहरात ७३ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने शहर हॉटस्पॉट बनले आहे. ६ लोकांनी मृत्यूला कवटाळले. रुग्णांना अमरावतीला नेण्याकरिता गोरगरिबांकरिता १०८ रुग्णवाहिकेची सुविधा असून कॉल केल्यास आधी बेड उपलब्ध आहे का, हे सांगा तरच रुग्णवाहिका असे सांगण्यात येत असल्याने गोरगरीब रुग्णांवर घरीच मृत्यूला कवटाळण्याची वेळ आली आहे.
वरूड तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ होत असून कोरोना चाचणी अहवालात रोज दहाच्या पटीत वाढ होत आहे. चाचणी अहवालात वरूड शहरात सोमवारी ६४, मंगळवारी ६७, तर बुधवारी ७३ जण पॉझिटिव्ह आलेत. तालुक्यात सोमवारी १४६, मंगळवारी १५३ आणि बुधवारी १६७ अशी आकडेवारी होती. एकाच दिवशी ६ मृत्यू झाल्याने वरूड तालुका हादरला आहे.
बुधवार, २८ एप्रिल रोजी वरूड शहरात ७३, तर शेंदूरजनाघाट १०, टेम्भूरखेडा ११, जरूड ६, पुसला ८ ही गावे हॉटस्पॉट ठरली आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परंतु प्रशासन गंभीर नसून प्रशासन कोरोनाग्रस्त होत असल्याने अधिकरी सुद्धा धास्तावले आहेत. नागरिक मात्र सैराट झाले आहेत. राज्य शासनाचे आदेश पायदळी तुडविले जात आहे. कुणाचे कुणावरही नियंत्रण राहिले नाही.
गर्दीला आवर घालणार कोण?
कोरोना चाचणी केंद्र आणि लसीकरण केंद्रावर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. खासगी दवाखान्यातही हीच अवस्था आहे. गर्दीला पायबंद घालणार तरी कोण, हा प्रश्न आहे. अनेकजण विना मास्क अकारण भटकंती करीत असतात. लॉकडाऊनची वाट लावल्याने शहरात कोरोना आहे की, नाही? अशी परिस्थिती आहे. वरूड शहर कोरोनाचे हॉटस्पॉट असताना कंटेनमेंट झोन गायब आहे. गृह विलगीकरणातील कोरोनाग्रस्तांची तपासणी सुद्धा बंद आहे. सॅनिटायझेशनदेखील होत नाही.
विलगीकरण केंद्र वाढविण्याची गरज
तालुक्यासाठी केवळ बेनोडा येथे क्वारंटाईन सेंटर सुरू असून तेथे १५ ते २० रुग्ण असतात. मात्र, वरूड शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना शहरात एकही विलगीकरण केंद्र सुरू केले नाही. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोविड केअर सेंटर म्हणून सुरू करण्याकरिता १५ ते २० बेड टाकून ठेवले. मात्र, कर्मचारी वर्गाचे नियोजन नसल्याने ते भकास पडून आहे.
बॉक्स ३
नियोजनाचा अभाव
आरोग्य, महसूल, नगरपालिका यात नियोजन नसल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार सुरू आहे. गंभीर रुग्णांना अमरावतीला हलवायचे असल्यास आधी बेड रिकामा आहे का, अशी विचारणा करा, असेल तरच येतो, असे सांगितले जात आहे. गोरगरीब रुग्णांनी जावे कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगीत जाण्याची ऐपत नाही. शासकीयमध्ये बेड नाही, अशा अवस्थेत रुग्णांना घरीच राहून जीव गमावण्याची वेळ आली आहे.