कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेटी बंद, मोबाईल, व्हिडीओ कॉलमधून भेटी सुरू
अमरावती : गृहविभागाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गत दहा महिन्यांपासून येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये कैदी बांधवांच्या रक्ताच्या नातेवाइकांसोबत भेटीला ‘ब्रेक’ लावला आहे. ही नियमावली आजतागायत कायम असून, गृहविभागाच्या पुढील आदेशापर्यंत ही भेट शक्य नाही. मात्र, मोबाईल, व्हिडीओ कॉलमधून भेटी सुरू आहेत.
कोरोना संसर्गामुळे मार्चपासून कारागृहात नवीन कैदी आणण्यापूर्वी १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात क्वारंटाईन ठेवण्यात येत आहे. यादरम्यान कैद्यांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली. चाचणी अहवालानंतरच नवीन कैद्यांना जुने कारागृहात प्रवेश दिला जातो. कोरोना संसर्गाचा फटका सर्वसामान्यांना बसला तसा चार भिंतींच्या आत असलेल्या कैद्यांनाही बसला आहे. कोरोनाकाळात दहा महिन्यांपासून नातेवाइकांची भेट दुरावली आहे. आई-बाबा, पत्नी, मुले यांना भेटीच्या निमित्ताने बघणेही कोरोनाने दुरापास्त झाले. रक्तांच्या नातेवाइकांशी मोबाईल, व्हिडीओकॉलमधून संवाद होत असला तरी त्याला भावनिक, कायद्याच्या मर्यादा आहेत. पाच ते सात मिनिटांत हा संवाद गुंडाळला जातो. या संकटात मोबाईल नेटवर्कची समस्या हीदेखील यात भर घालते. एकंदर कोरोना लवकरच जावो आणि नातेवाइकांना नजरेने बघता यावे, अशी मनोमन इच्छा कैद्यांची आहे.
--------------------------
कधी मोबाईल फोन, तर कधी व्हिडीओ कॉलिंग
गृहविभागाने कोरोना नियमवलीचे काटेकाेर पालन करण्याचे निर्देश दिले आहे. परिणामी कैद्यांचा बाहेरील व्यक्तीसोबत पुसटसाही संपर्क येऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत. कैद्यांना आठ दिवसांतून एकदा नातेवाइकांसोबत कधी मोबाईल फोन, तर कधी व्हिडीओ कॉलिंगमधून संवाद साधता येतो. या संवादाचे रेकॉर्डिंग करण्यात येते. विशेष म्हणजे, केवळ शिक्षाधीन कैद्यांनाच ही मुभा दिली आहे.
----------------------
स्वेटर नाहीच; ब्लँकेट, चादरीचा वापर
१० फेब्रुवारी उजाडले तरीही थंडी जायचे नाव घेत नाही. यंदा बोचरी थंडी होती. ऑक्टोबर, नोव्हेंबर या दरम्यान थंडीने कहर केला. परंतु, कैद्यांना नातेवाइकांकडून स्वेटर घेता आले नाही. कारण कोरोनामुळे बाहेरील साहित्य, वस्तू घेण्यास मनाई करण्यात आली. कारागृह प्रशासनाने कैद्यांना ब्लँकेट, चादरी दिल्या. थंडीपासून बचावाची हीच साधने ठरली.
------------------
कोट
गृहविभागाच्या सूचनांप्रमाणे जुने कारागृहात नवीन कैद्यांना प्रवेश देताना कोरोना नियमावलीचे पालन करण्यात आले. हल्ली नातेवाइकांसोबत कैद्यांच्या भेटी बंद आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन कैद्यांना १४ दिवस क्वारंटाईन अनिवार्य आहे
- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती.
------
मध्यवर्ती कारागृहातील आकडेवारी अशी
कारागृहाची क्षमता- ९७३
कैदी संख्या- १०८४